नगराध्यक्षांचा निर्णय प्रदेशाध्यक्ष घेतील

By admin | Published: July 8, 2014 10:51 PM2014-07-08T22:51:06+5:302014-07-08T23:19:06+5:30

व्हिक्टर डान्टस : राष्ट्रवादी पक्षनिरीक्षक उद्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार

The head of state will take the decision of the head of state | नगराध्यक्षांचा निर्णय प्रदेशाध्यक्ष घेतील

नगराध्यक्षांचा निर्णय प्रदेशाध्यक्ष घेतील

Next

सिंधुदुर्गनगरी : मालवण, वेंगुर्ला, सावंतवाडी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसंदर्भात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष निर्णय घेणार असून पक्ष निरीक्षक गुरुवारी ओरोस येथील बैठकीत जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्हिक्टर डान्टस यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व्हिक्टर डान्टस, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष अबीद नाईक, कार्याध्यक्ष प्रसाद रेगे यांनी संयुक्तरित्या घेतलेल्या पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की, मालवण, वेंगुर्ला, सावंतवाडी नगराध्यक्षपदाची निवडणूक १७ जुलैला होणार आहे. त्यादृष्टीने प्रदेशाध्यक्ष निर्णय घेणार आहेत. त्यांना अधिकार आहेत. त्यांनी निरीक्षक पाठवावा अशी मागणी आम्ही केली आहे. गुरुवार १० जुलैला ओरोस येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे. आपल्या व्यथा मांडाव्यात असे आवाहन करण्यात आले आहे.
यावेळी बोलताना डान्टस म्हणाले की, राष्ट्रवादी पक्ष अडचणीत असताना पक्षाने आमच्यावर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. तरीही पक्षाचे हित लक्षात घेऊन आमच्यामुळे जर पक्षाला बाधा येणार असेल तर आम्ही केव्हाही पद सोडायला तयार आहोत. पक्ष मोठा झाला पाहिजे.
शरद पवार यांचे विचार जनतेपर्यंत पोहोचविणे सर्वांचेच काम आहे. तेव्हा पक्षापेक्षा व्यक्ती मोठी नाही. शरद पवार यांचे विचार जनतेपर्यंत पोहोचविण्यात आम्ही कमी पडलो. त्यामुळे निवडणुकीत अपयश आले हे मान्यच करावे लागेल. मला राष्ट्रवादीत गट-तट मान्य नाही. मात्र काहीजण दुखावले असतील तर त्यांनी पक्ष निरीक्षकांशी चर्चा करावी. पक्षहितासाठी एकत्रित यावे. एकमेकांवर वृत्तपत्रातून टीकाटीप्पणी करून, एकमेकांशी झगडत बसून पक्षाचे नुकसान करण्यापेक्षा एकत्रितपणे पक्षाचे धोरण जनतेसमोर मांडायला हवे.
वैचारिक मतभेद असले तरी सर्व कार्यकर्त्यांची पक्षाला गरज आहे. त्यामुळे त्यांनी हेवेदावे बाजूला ठेवून पक्षाला बळ देण्याची गरज आहे. मग मालवण नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक पूजा करलकर असोत अथवा आमदार दीपक केसरकर असोत. या सर्वांनी पुन्हा एकदा या प्रवाहात यावे. उमेदवार पक्षश्रेष्ठी निवडणार आहेत. ते जो उमेदवार देतील त्याच्या पाठिशी आम्ही राहणार आहोत. तेव्हा कोणीही गैरसमज करून घेऊ नये.
तसेच एकमेकांवर टीकाटीप्पणी करून पक्षाला अडचण निर्माण करण्यापेक्षा आपल्या व्यथा, समस्यांबाबत वरिष्ठांशी चर्चा करून सोडवाव्यात. पदापेक्षा पक्षाला महत्त्व देतो. जिल्ह्याची नाजूक स्थिती निर्माण झाली असताना कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण होऊ नये यासाठी आमच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. ती जबाबदारी स्वीकारणारा पक्षाला मिळाला की आम्ही केव्हाही यातून मुक्त होऊन पक्षासाठी एकनिष्ठेने काम करायला तयार आहोत, असे डान्टस यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)

Web Title: The head of state will take the decision of the head of state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.