चेन स्नॅचिंगप्रकरणी आरोग्यसेवक अटकेत
By admin | Published: November 26, 2015 11:27 PM2015-11-26T23:27:36+5:302015-11-26T23:55:02+5:30
खारेपाटण येथील घटना : युवतीची तक्रार
कणकवली : तालुक्यातील नडगिवे येथील युवतीच्या गळ्यातील सोन्याची चेन खेचून पसार झालेल्या चोरट्याला तब्बल पाच दिवसांनंतर पाळत ठेवून ग्रामस्थांच्या साहाय्याने पोलिसांनी पकडले. राजापूर तालुक्यातील केळवली प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्यसेवक म्हणून तो कार्यरत आहे. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता, २ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.याबाबत अधिक वृत्त असे की, नडगिवे गावठणवाडी येथील कोमल जगदीश सावंत (वय १६) ही विद्यार्थिनी २१ नोव्हेंबर रोजी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास आपल्या मावशीला नडगिवे बसस्टॉपवर सोडून घरी चालली होती. यावेळी दुचाकी (एम.एच. ०९ जे ९२६०) वरून आलेल्या चालकाने वैभववाडीकडे जाणाऱ्या रस्त्याबाबत विचारणा करण्याचा बहाणा केला आणि युवतीच्या गळ्यातील सात ग्रॅम वजनाची १५ हजार रुपये किमतीची सोन्याची चेन खेचून पोबारा केला होता. कोमलने चोरट्याला अडविण्याचा प्रयत्न केला असता त्याने तिच्या तोंडावर हात मारून दुखापत केली. याबाबत तिने खारेपाटण पोलीस दूरक्षेत्रात तक्रार दिली होती. या तक्रारीनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली खारेपाटण पोलीस दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एम. बी. रावराणे, हवालदार पी. एस. तुपसुंदर, एस. ए. कदम हे शोध घेत होते.
बुधवारी (दि. २५) रात्री ९ वाजण्याच्या सुमारास एक युवक चोरीच्या उद्देशाने पुन्हा खारेपाटण परिसरात दाखल झाला. खारेपाटण गुरववाडीनजीक आल्यावर पुन्हा त्याच पद्धतीने दुचाकीवरून रस्त्यावरून चालणाऱ्या एका युवतीच्या दिशेने दागिने चोरीच्या उद्देशाने येऊ लागला; परंतु युवतीला त्याचा संशय आल्याने तिने गुरववाडीतील ग्रामस्थांकडे धाव घेत घडलेल्या प्रकाराबाबत माहिती दिली. अधिक चौकशी केल्यानंतर दुचाकीस्वार पद्माकर अनुरथ घाडगे (वय ३३, रा. केळवली, शेंगाळेवाडी, ता. राजापूर, जि. रत्नागिरी) मूळ राहणार उस्मानाबाद येथील असल्याचे स्पष्ट झाले. तसेच त्याने २१ नोव्हेंबरला नडगिवे येथून आपणच सोन्याची चेन खेचून पोबारा केल्याची कबुली दिली. पद्माकर घाडगे हा केळवली प्राथमिक आरोग्यकेंद्रात आरोग्यसेवक म्हणून कार्यरत आहे. तसेच त्याच्याजवळील मोटारसायकलचा क्रमांक एम. एच. १०, एजे ९२६० असल्याचे आढळून आले. (वार्ताहर)
सिंधुदुर्गसह रत्नागिरीत खळबळ
गेली सहा वर्षे तो आरोग्यसेवक म्हणून केळवली येथे काम करीत आहे. तसेच उरलेल्या वेळेत चेन स्नॅचिंग करीत असल्याचे तपासात पुढे आले आहे. चेन स्नॅचिंगप्रकरणी आरोग्यसेवकाला अटक झाल्याने सिंधुदुर्गसह रत्नागिरी जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत. घाडगे याच्या अटकेमुळे आणखीन काही चेन स्नॅचिंगची प्रकरणे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.