आरोग्य विभागास धरले धारेवर

By admin | Published: November 9, 2015 10:50 PM2015-11-09T22:50:19+5:302015-11-09T23:27:17+5:30

मालवण पालिका सभा वादळी : तत्काळ कार्यवाहीच्या नगराध्यक्षांच्या प्रशासनास सूचना

Health Department held Dharevar | आरोग्य विभागास धरले धारेवर

आरोग्य विभागास धरले धारेवर

Next

मालवण : मालवण पालिकेच्या सर्वसाधारण सभेत सोमवारी आरोग्यासह पथदीपाचा प्रश्न चांगलाच पेटला. बंद अवस्थेतील पथदीप, डास फवारणी यंत्रणा, कचऱ्याचे ढीग अशा सर्व प्रश्नांवरून माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, महेश जावकर, पूजा करलकर व शिवसेना नगरसेवक रविकिरण आपटे यांनी पालिका प्रशासनाला जाब विचारात आरोग्य विभागाला चांगलेच धारेवर धरले.
वारंवार प्रश्न उपस्थित करूनही ते सुटत नसतील तर सभात्याग करणेच योग्य असा आक्रमक पवित्रा जावकर यांनी घेतला. अखेर आचरेकर यांच्या विनवणीने जावकर यांचा सभात्याग थांबला मात्र सर्व नगरसेवकांनी मांडलेल्या समस्या पाहता नगराध्यक्ष अशोक तोडणकर यांनी प्रशासनास फैलावर घेताना काम जमत नसेल तर पालिकेस टाळे ठोका, असा संतप्त सूर आळवत तात्काळ कार्यवाहीचे आदेश दिले आहेत.
नगराध्यक्ष अशोक तोडणकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेत मुख्याधिकारी अरविंद माळी यांच्यासह नगरसेवक सुदेश आचरेकर, महेश जावकर, दीपक पाटकर, मंदार केणी, जॉन नऱ्होना, रविकिरण आपटे, महानंदा खानोलकर, संतोषी कांदळकर, स्नेहा आचरेकर, पूजा करलकर, रेजिना डिसोजा, शिला गिरकर, दर्शना कासवकर, आदी उपस्थित होते. सभेच्या सुरवातीलाच नगरसेवक जावकर यांनी पालिकेच्या इमारतीतील सांडपाणी गटारात सोडल्याने नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. पालिकेचा हा कारभार संपूर्ण शहरात अशाच पद्धतीने सुरु असून आरोग्य यंत्रणाच कोलमडली आहे. नगरपरिषदेचे आरोग्याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप करत प्रभाग एक व दोन याठिकाणी न होणारी डास फवारणी पाहता हा भाग पालिकेने गडचिरोली सारखा दुर्लक्षित केला की काय असा सवाल केला.
याच वेळी आरोग्याच्या प्रश्नावर माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, करलकर, आपटे यांनी प्रश्न उपस्थित केले. आरोग्य यंत्रणा अपेक्षित काम करत नाही. मुख्याधिकाऱ्यांचे त्यांच्याकडे लक्ष नसल्याचा आरोपही केला. ही बाब नगराध्यक्षांनी गांभीर्याने घेत प्रशासनास खडेबोल सुनावले. जो विभाग काम करत नसेल त्यांच्यावर तात्काळ कारवाई करा. अन्यथा पालिकेला टाळे ठोका, असे संतप्त स्वरात सांगत तात्काळ कार्यवाहीचे आदेश दिले.
पूजा करलकर यांनी इतिवृत्त वाचनाची मागणी केली. मात्र, मागील सभेत कचऱ्याच्या ठेक्याला मुदतवाढ या विषयावर एका ज्येष्ठ नगरसेविकेने ‘आमच्या ठेक्याला विरोध का’ ? हा उपस्थित केलेला प्रश्न इतिवृत्तात नाही, असे सांगितले. नगराध्यक्ष तोडणकर यांनी इतिवृत्तावर सही झालेली आहे. आता बदल करता येणार नाही. त्याचवेळी हा बदल करायला हवा होता. असे सांगितले. मात्र करलकर यांनी जर विकास आराखड्यात १३९ चा ठराव मागावून घेतला गेल्याचे दाखवले जाते, तर हा मुद्दा का नाही ? मात्र, नगरसेवक आचरेकर यांच्यासह तोडणकर यांनी इतिवृत्तात बदल केल्यास विरोध दर्शविला. यावर करलकर यांनी बदल करणे शक्य नसल्यास आज उपस्थित केलेला मुद्दा पुढील इतिवृत्तात आलाच पाहिजे, असे स्पष्ट
केले. (प्रतिनिधी)


फौजदारी दाखल करा : वीज वितरण, बिल्डर लक्ष्य
शहरात स्ट्रीट लाईट सेवा देण्यात वीज वितरणचा मनमानी कारभार आडवा येत आहे. गरीब जनतेला अडवणुकीचे धोरण स्वीकारणारी वीज वितरण शहरातील कॉम्प्लेक्सना पालिकेची एनओसी नसतानाही वीज देते. त्यामुळे अशा कॉम्प्लेक्ससह वीज वितरणवर फौजदारी कारवाईची मागणी आचरेकर यांनी केली असता त्याबाबत तात्काळ कारवाईचे आदेश नगराध्यक्षांनी प्रशासनास दिले आहेत. तर नगरसेवक आपटे यांनी यापूर्वी पालिकेची बदनामी करत वीज वितरणने ६५ हजाराहून अधिक रक्कम येणे दाखवली. प्रशासनाने सभेचा ठराव असतानाही फौजदारी का दाखल केली नाही ? असा ठराव केला. मुख्याधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांच्या आदेशाने वीज वितरणने यापुढे कर्मचारी देण्याची तयारी दर्शवली व पुन्हा मागील थकबाकी बाबत प्रश्न उपस्थित न केल्याचे सांगितले.

Web Title: Health Department held Dharevar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.