सावधान..! सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलिसांचे आरोग्य बिघडतेय, अतिरिक्त कामाचा ताणतणाव

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2024 01:57 PM2024-09-18T13:57:47+5:302024-09-18T13:58:18+5:30

आरोग्याकडे दुर्लक्ष ठरू शकते घातक

Health of police in Sindhudurg district is deteriorating, additional work stress | सावधान..! सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलिसांचे आरोग्य बिघडतेय, अतिरिक्त कामाचा ताणतणाव

संग्रहित छाया

वैभव साळकर

दोडामार्ग : मोर्चे..आंदोलने..नाकाबंदी..निवडणुका..गुन्ह्यांचा तपास..सण-उत्सवातील बंदोबस्त..२४ तास ऑन ड्यूटी..हक्काची सुटी ही देण्यात अडचणी, अशा विविध प्रश्नांनी जखडलेल्या सिंधुदुर्गपोलिस दलातील कर्मचाऱ्यांचे आरोग्य बिघडत चालले आहे. जिल्ह्यातील ३० टक्के कर्मचाऱ्यांना रक्तदाब, मधुमेह हृदयविकारासह विविध आजार जडले आहेत. पोलिस प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जात असली तरी त्या उपाययोजना कमीच पडत आहेत.

‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ असे ब्रीदवाक्य असलेल्या पोलिसांवर कामाचा ताण वाढत चालला आहे. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचे दौरे, गणेशोत्सव, नवरात्र, आंदोलने यामुळे वर्षातील आठ ते नऊ महिने ते बंदोबस्तातच असतात. परिणामी, त्यांना स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्यास पुरेसा वेळही मिळत नाही. शिवाय चोरी, घरफोडी, खून, मारामारी आदी घटनांच्या तपासाचा ताणही असतो. एक संपत नाही तोवर दुसऱ्या गुन्ह्याचा तपास सुरू होतो, यातूनच कर्मचाऱ्यांना अनेक आरोग्यविषयक समस्या उद्भवू लागतात. परिणामी, पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह आदी आजारांचे प्रमाण वाढले आहे. कामाच्या ताणामुळे मानसिक आजारही जडत आहेत.

अपुरे मनुष्यबळ?

जिल्ह्याची लोकसंख्या १५ लाखांहून अधिक आहे. तर पोलिसांची संख्या साधारणतः अकराशेच्या आसपास आहे. त्यातील दरवर्षी ५० ते १०० कर्मचारी निवृत्त होतात. त्यामुळे कमी पोलिस बळामुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येतो. शिवाय सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांची वाढती संख्या आणि विमानतळाची सुरक्षिततेची जबाबदारीही पोलिसांवर असते. त्यामुळे अतिरिक्त ताण कमी करण्यासाठी पर्यटन असलेल्या तालुक्यांमध्ये मनुष्यबळ वाढविण्याची गरज आहे. तर आस्थापना मंजूर करताना जुने निकष न लावता बदललेल्या परिस्थितीचा विचार करून मंजूर पदांची संख्या वाढविली पाहिजे.

कुटुंबासाठी वेळ आहे कुठे?

२४ तास ऑन ड्यूटी असलेल्या पोलिस कर्मचारी व अधिकाऱ्यांना सर्रास कुटुंबासाठी वेळ देता येत नाही. त्यामुळे त्यांच्या मानसिकतेवर परिणाम होतो. मुलांचे आरोग्य, शिक्षण याकडेही दुर्लक्ष होते. त्यातून कुटुंबात कलह निर्माण होतात आणि कौटुंबिक स्वास्थ्य बिघडते.

व्यायामशाळा व स्वीमिंग पूल हवे

ऑन ड्यूटी २४ तास असलेल्या पोलिसांना आरोग्याकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही. त्यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्यात व्यायामशाळा हवी, याशिवाय स्वीमिंग पुलाचीही व्यवस्था असायला हवी.

पोलिस कुटुंब आरोग्य योजनेला खोडा

राज्य शासनाने पोलिस आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी महाराष्ट्र पोलिस कुटुंब आरोग्य योजना जाहीर केली. योजना कॅशलेस आहे; पण या योजनेचा लाभ देताना मंत्रालयातील ‘बाबू’ अधिकाऱ्यांकडून रुग्णालयाकडून आलेली बिले पास करताना त्रुटी काढून परत पाठविली जातात. त्यामुळे कागदी घोडे नाचविताना पोलिसांची दमछाक होते.

Web Title: Health of police in Sindhudurg district is deteriorating, additional work stress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.