ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य धोक्यात
By admin | Published: October 5, 2015 10:05 PM2015-10-05T22:05:45+5:302015-10-06T00:21:53+5:30
गुहागर तालुका : रूग्णसेवेसाठी पुरेशा सुविधा, कर्मचारीवर्ग नसल्याने अडचण
संकेत गोयथळे - गुहागर ग्रामीण रुग्णालयात सध्या चार वैद्यकीय अधिकारी असल्याने रोजची रुग्णसंख्या वाढली आहे. मात्र, चांगल्या रुग्णसेवेसाठी पुरेशा सुविधा व कर्मचारीवर्ग उपलब्ध नाही. चार वर्षांपूर्वी पूर्ण झालेल्या वीस खाटांच्या दुमजली इमारतीचा ताबा अद्याप रुग्णालयाकडे मिळालेला नसल्याने दाखल होणाऱ्या रुग्णांची गैरसोय होत आहे. तसेच येथे भूलतज्ञ उपलब्ध होत नसल्याने सध्या स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर असूनही सिझर प्रसुती केस अनेकवेळा जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये पाठवावी लागत आहे. गुहागर ग्रामीण रुग्णालयामध्ये डॉ. एस. के. बलवंत (बालरोग तज्ज्ञ), सुरेश भाले (स्त्रीरोग तज्ज्ञ), आयुष अंतर्गत डॉ. नीलेश ढेरे व कंत्राटी पद्धतीवर डॉ. स्वप्नाली भाले या कार्यरत आहेत. यापूर्वी डॉ. बलवंत व डॉ. भाले हे दोनच वैद्यकिय अधिकारी कार्यरत होते. डॉक्टर संख्या वाढल्याने यापूर्वी रोजची सरासरी ५० असणारी रुग्णसंख्या आता १०० ते १५० एवढी वाढली आहे. अशास्थितीत तापाची साथ किंवा एकाचवेळी अनेक रुग्ण दाखल करुन घेण्याची वेळ आल्यास सध्या दोन वर्षांपूर्वी नव्याने बांधण्यात आलेली दहा खाटांची इमारत आहे. यापेक्षा अधिक रुग्ण दाखल झाल्यास दाटीवाटीने खाली गादी टाकून रुग्णांना ठेवावे लागते. अशावेळी गर्दी झाल्याने नव्या रुग्णांना सामावून घेण्यासाठी जुन्या रुग्णांना जास्त वेळ ठेवता येत नाही.
चार वर्षांपूर्वी २० खाटांची सोय असणारी दुमजली अद्ययावत इमारत याच इमारतीच्या पाठीमागे बांधून तयार आहे. मात्र, या इमारतीमध्ये लाईट व्यवस्था नाही व तांत्रिक अडचणीची सोडवणूक न केल्याने बांधकाम विभागाने अद्याप रुग्णालयाकडे तिचा ताबा दिलेला नाही. इमारत असूनही रुग्णांची मात्र गैरसोय होत आहे.
डॉ. सुरेश भाले हे काही वर्षांपूर्वी गुहागर ग्रामीण रुग्णालयात कार्यरत होते. काही वर्षानंतर ते पुन्हा रुजू झाले असून, त्यांची नियुक्ती कामथे (चिपळूण) रुग्णालयात आहे. गुहागर येथे स्त्रीरोग तज्ज्ञ नसल्याने आमदार भास्कर जाधव यांनी हा विषय वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा केल्यानंतर डॉ. भाले यांनी गुहागर ग्रामीण रुग्णालयात सेवा द्यावी अशी अंतर्गत तडजोड करण्यात आली.
स्त्रीरोग तज्ज्ञ आल्याने यापूर्वी महिन्याला सरासरी १० ते १२ होणाऱ्या प्रसुतीचा आकडा आता २० हून अधिक झाला आहे. गुहागरमध्ये स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध असूनही अनेकवेळा सिझर प्रसुतीमध्ये येथे तत्काळ भूलतज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध होऊ शकत नसल्याने प्रसृतीसाठी दाखल झालेल्या महिलेसह नातेवाईकांचा जीवही टांगणीला लागतो. यामुळे अडचणीच्या अशा सिझर प्रसुतीसाठी रुग्ण जिल्हा शासकीय रुग्णालयाकडे पाठवला जातो. गुहागरमध्ये आवश्यक रक्त मिळू शकत नाही. अशास्थितीत भूलतज्ज्ञ डॉक्टर असूनही सिझर प्रसुती मोठ्या प्रमाणात होत नसल्याने पूर्वीप्रमाणेच ‘जैसे थे’ स्थिती आहे. गरोदर महिलांच्या तपासणीसाठी आवश्यक सोनोग्राफी मशीन कालबाह्य झाल्याने सील करण्यात आले आहे. ते नव्याने मिळणे आवश्यक आहे. सोनोग्राफी मशीन नसल्याने तालुक्यातून विविध ठिकाणाहून येणाऱ्या गरोदर महिलांची अचूक तपासणी करता येत नाही. यासाठी अन्य ठिकाणी महागड्या दराने तपासणी करावी लागते.
या रुग्णालयासाठी एक्स-रे मशीन आहे. एक्स-रे टेक्निशिअन पद भरलेले असूनही जिल्ह्यात अन्य रिक्त ठिकाणी कामगिरीवर काढले जात असल्याने गुहागरसाठी एकमेव वार हा गुरुवार देण्यात आला आहे.
लॅब टेक्निशियन हे पद रिक्त असले तरी असिस्टंट कर्मचारी आहे. मात्र, न्यायालयीन प्रक्रियेमुळे कर्मचारी येत नाही. यामुळे कनिष्ठ लिपीकावरच कार्यालयीन काम भागवले जात आहे.
सध्या औषधसाठा व मागणी आॅनलाईन सॉफ्टवेअरद्वारे करावी लागत असल्याने फार्मासिस्ट नसल्याने कार्यालयीन कामात मोठ्या अडचणी येत असून, रुग्णांचीही गैरसोय होत आहे. यापूर्वी कार्यरत असणारे डॉ. स्वामी हे पाच वर्षापूर्वीपासूून अनधिकृत गैरहजर आहेत. आरोग्य संचालकांकडे याबाबत जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अहवाल पाठवूनही कोणतीच पाऊले उचलली जात नाहीत. या पदावर कागदोपत्री डॉ. स्वामी असल्याने अनेकवेळा भरती प्रक्रिया होऊनही या जागी प्रशासन अन्य डॉक्टर देऊ शकत नाही असा प्रशासकीय सावळा गोंधळ चालू आहे.
सध्या जननी सुरक्षा योजनेंतर्गत एक रुग्णवाहिका व चालक उपलब्ध आहे. स्कूल हेल्थसाठी चार वेगळे डॉक्टर आहेत. परंतु, यासाठी असणाऱ्या रुग्णवाहिकेसाठी चालक नाही. रुग्णालयाच्या शौचालयाच्या टाक्या पूर्ण भरुन याचे पाणी बाहेर येऊन गटार निर्माण झाले आहे. या गटाराशेजारीच गरोदर महिला एचआयव्ही तपासणी केंद्र व रक्त तपासणी केंद्र आहे. जवळच रुग्णांना दाखल करुन घेण्याची इमारत असल्याने दुर्गंधीमुळे डासांचा प्रभाव वाढून हा भाग आरोग्यास धोकादायक बनला आहे.
आॅनलाईन पद्धतीमुळे औषधसाठा मिळणे मुश्किल
शौचालय टाकीची बांधकाम विभागाकडून पाहणी करण्यात आली. ही टाकी काढण्यासाठी जेसीबी या ठिकाणापर्यंत पोहोचू शकत नसल्याने हे काम राहिले असून, बांधकाम विभागाकडून नव्याने नाला काढण्यासाठी प्रस्ताव केला जाणार आहे. पुरेसा औषधसाठा उपलब्ध होत असूनही सध्या आॅनलाईन पद्धतीने औषधसाठा मागणी करावी लागत असल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत.
- डॉ. एस. के. बलवंत, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक.
रुग्ण दाखल करण्याच्या हॉलसाठी पुरेसे व्हेंटीलेशन नाही. येथे डास असल्याने रात्रीच्यावेळी दारे खिडक्या बंद केल्यानंतर रुग्णांना कोंडल्यासारखे होते. यासाठी खिडक्यांना जाळ्या लावणे आवश्यक आहे.
- गजानन बेंडल, रुग्णकल्याण समिती सदस्य.
यापूर्वी कामथे येथील प्रमुख डॉ. कांचन मदार यांच्याकडे गुहागर ग्रामीण रुग्णालयाचा चार्ज होता. यावेळी मदार या स्त्रीरोग तज्ज्ञ असल्याने कठीण व सिझर प्रसुतीसाठी कामथे येथे पाठवले जात होते. काही महिन्यांपूर्वी डॉ. एस. के. बलवंत यांच्याकडे वैद्यकीय अधीक्षक पदाचा प्रभारी चार्ज देण्यात आला आहे. तसेच कामथेसाठी नियुक्त झालेल्या डॉ. सुरेश भाले यांना गुहागर येथे कार्यरत राहण्याचे आदेश वरिष्ठ पातळीवरुन देण्यात आल्याने कामथे व गुहागर रुग्णालयांचा पूर्वीप्रमाणे समन्वय राहिलेला नाही. आता गुहागरमधून प्रसुतीसाठीचे रुग्ण थेट रत्नागिरी येथे पाठवले जात आहेत. अनेकवेळा प्रसुती दरम्यान तब्बल दोन तासाहून अधिक अंतर असलेल्या रत्नागिरी येथे नेताना प्रवासादरम्यान रुग्णाला काही झाल्यास याची जबाबदारी कोण घेणार? असा सवाल जनतेकडून विचारला जात आहे.