नियोजनाच्या अभावामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा कोलमडली, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेलींचा आरोप
By अनंत खं.जाधव | Published: March 23, 2023 04:33 PM2023-03-23T16:33:32+5:302023-03-23T16:36:14+5:30
..यामुळे आमचे सरकार चांगले काम करून ही बदनाम
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेत ज्या त्रुटी आहेत, त्या अधिकाऱ्याच्या नियोजनाच्या अभावातून राहिल्या आहेत. यामुळे आमचे सरकार चांगले काम करून ही बदनाम होत आहे. असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. आरोग्य मंत्र्यांपर्यंत या सर्व तक्रारी पोचवल्या जातील सर्व सामान्य जनतेला चांगली आरोग्य सुविधा मिळालीच पाहिजे अशी मागणी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केली.
ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी सिंधुदुर्ग बँकेचे संचालक महेश सारंग, माजी नगराध्यक्ष संजू परब, मनोज नाईक, आनंद नेवगी, अजय गोंदावले आदी उपस्थित होते.
तेली म्हणाले, जिल्ह्यात विविध विभागांसाठी तीन हजार कोटीचा निधी आला आहे. यातून अनेक विकासात्मक प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. पहिल्यांदाच एवढा निधी आला आहे. जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेत मोठ्याप्रमाणात त्रुटी आहेत याबाबतच्या तक्रारी आल्या. त्यानंतर मी स्वत: आरोग्य अधिकारी तसेच जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याशी चर्चा केली आहे. असे असतानाही जर काही प्रश्न राहिले असतील तर ते ही सोडवू असे तेली यांनी स्पष्ट केले.
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात इंजेक्शन तसेच औषधे नाहीत असे प्रकार पुन्हा घडू नये यासाठी पालकमंत्री औषधे खरेदी साठी निधी दिला आहे. तो निधी खर्च झाला नसेल तर त्याच्यावर कारवाई केली जावी. तसेच कोरोना काळात रुग्णवाहिका देण्यात आल्या आहेत. त्याही पडून असल्याने तेली यांनी नाराजी व्यक्त केली. सरकार आरोग्यावर मोठ्याप्रमाणात खर्च करत असताना रूग्णांना औषधे बाहेरून आणण्यास सांगणे म्हणजे सरकारला बदनाम करण्यासारखे असल्याचे तेली म्हणाले.
मल्टीस्पेशालिटी किंवा कबुलातदार प्रश्न सुटावा
मल्टीस्पेशालिटी रूग्णालयाचा प्रश्न किंवा कबुलातदार गावकर प्रश्न सुटलाच पाहिजे तो कोणी ही सांगून सुटला गेला पाहिजे यासाठी आमचे प्रयत्न सुरू असून श्रेय कोण घेणार हे महत्वाचे नाही.प्रश्न सुटणे महत्वाचे आहे. जर सावंतवाडीत हे रूग्णालय शक्य नसेल तर इतरत्र करा अशी मागणी ही तेली यांनी केली.
जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा पण अद्याप मंजूर नाही
मला जिल्हाध्यक्ष होऊन तब्बल पावणे चार वर्षे झाली आहेत त्यामुळे मीच आता जिल्हाध्यक्ष पद नको दुसऱ्याला संधी द्या असे पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाला सांगितले आहे. मात्र दिलेला राजीनामा अद्याप मंजूर केला नाही. राजीनामा मंजूर झाल्यानंतर पूर्ण वेळ मला सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात काम करायचे आहे असे तेली यांनी सांगितले.