‘आरोग्य’चे टीमवर्क कौतुकास्पद
By admin | Published: March 30, 2016 10:43 PM2016-03-30T22:43:17+5:302016-03-30T23:50:38+5:30
संग्राम प्रभुगावकर : आनंदीबाई जोशी पुरस्काराचे वितरण
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गात सर्वांत चांगले काम हे आरोग्य विभागाचे आहे. या विभागाचे टीमवर्क कौतुकास्पद आहे. या विभागाच्या प्रामाणिक कामाचे हे फलित असल्याचे सांगतानाच आशा कर्मचाऱ्यांना दिवाळीला भाऊबीज म्हणून मिळणारी पाचशे रुपये रक्कम कमी असून ती वाढवून देण्याचा आपला विचार असल्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभुगांवकर यांनी डॉ. आनंदीबाई जोशी पुरस्कार सोहळ्याच्या वितरणावेळी सांगितले.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्यावतीने डॉ. आनंदीबाई जोशी गौरव पुरस्कार, सर्वोत्कृष्ट आशा, गटप्रवर्तक व नाविन्यपूर्ण आरोग्य सखी पुरस्कार तसेच सावित्रीबाई फुले कन्या कल्याण योजना पात्र जोडप्यांचा सत्कार, आदी समारंभांचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी संग्राम प्रभुगावकर बोलत होते.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह, उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, आरोग्य सभापती आत्माराम पालेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, एन. आर. एच. एम. चे प्रकल्प संचालक संतोष सावंत, आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह म्हणाले की, दुर्गम भूभाग तसेच अपुरी साधनसामुग्री व कमी मनुष्यबळ असतानाही सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग अत्यंत कार्यक्षम आहे. या विभागाकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यात चांगले काम झाले आहे. आरोग्यविषयक अनेक योजना या विभागाने प्रभावीपणे राबविल्या आहेत. अर्भक मृत्यूदर व माता मृत्यूदर कमी करण्यासाठीही हा विभाग प्रयत्नशील असून प्रतिकूल परिस्थितीतही या विभागाचे अधिकारी, कर्मचारी व सेविका या होकारार्थी ऊर्जा घेऊन कार्य
करीत असतात, असे मत व्यक्त
केले.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जिल्हास्तरीय सर्वोत्कृष्ट गटप्रवर्तक पुरस्कार अंतर्गत मसुरे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या गटप्रवर्तक पल्लवी नाचणकर यांना प्रथम क्रमांकाचे, माणगांव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रश्मी लंगवे यांना द्वितीय क्रमांकाचे, तर आडेली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या गटप्रवर्तक पूजा तोरसकर व रेडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जिविता राऊळ यांना विभागून तृतीय क्रमांकाच्या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी आरोग्य समितीचे सभापती आत्माराम पालेकर, उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक डॉ. योगेश साळे आणि पी. आर. चव्हाण यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
बांदा उत्कृष्ट आरोग्य केंद्र
तसेच उत्कृष्ट प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणून प्रथम क्रमांकासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र बांदा, द्वितीय क्रमांकासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र पडेल व तृतीय क्रमांकासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र खारेपाटण यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. याशिवाय तालुकास्तरीय सर्वोत्कृष्ट आशा स्वयंसेविका पुरस्कारांचेही तालुकानिहाय वितरण करण्यात आले.
गायत्री कांडरकर जिल्हास्तरावर प्रथम
जिल्हास्तरीय सर्वोत्कृष्ट आशा स्वयंसेविका पुरस्कार अंतर्गत सांगेली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आशा स्वयंसेविका गायत्री कांडरकर यांना प्रथम, तर उंबर्डे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आशा स्वयंसेविका सुश्मिता कांबळे यांना द्वितीय क्रमांकाच्या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.