आमदार नितेश राणेंना जामीन मिळणार? थोड्याच वेळात होणार फैसला!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2022 04:00 PM2022-02-08T16:00:21+5:302022-02-08T17:03:21+5:30
राणे यांना छातीत दुखत असल्याने काल, दुपारी कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
कणकवली : संतोष परब हल्ल्यातील गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी सुनावलेल्या भाजप आमदार नितेश राणेंच्या जामीन अर्जावर थोड्याच वेळात फैसला होणार आहे. त्यांचे बंधू माजी खासदार निलेश राणे हे जिल्हा न्यायालयात दाखल झाले आहेत. नितेश राणे यांचे वकील सतीश मानशिंदे, संग्राम देसाई हे देखील न्यायालयात दाखल झाले आहेत. तर सरकारी वकील प्रदीप घरत हेही उपस्थित आहेत.
दरम्यान काल, सोमवारी राणे यांना छातीत दुखत असल्याने दुपारी कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी त्यांची इको चाचणी घेण्यात आली. मात्र, या चाचणीचा अहवाल सामान्य आला, पण त्यांचा रक्तदाब वाढला होता. सध्याही त्यांना स्पॉन्डिलायटिसचा त्रास असून, त्यावर आता उपचार करण्यात येणार आहेत. विविध विभागांचे प्रमुख डॉक्टर त्यांच्या तब्येतीवर लक्ष ठेवून आहेत.
आमदार नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर शनिवारी (दि.५)आज सुनावणी होणार होती. परंतु विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश ऐवजी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या न्यायालयात ही सुनावणी घेण्याची मागणी केल्याने व यासाठी केलेला अर्ज परिपूर्ण नसल्याने ही सुनावणी सोमवार (७ फेब्रूवारी) पर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय न्यायालयाने दिला होता. मात्र काल ही सुनावणी होवू शकली नाही. त्यामुळे आजच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.