फळमाशीअभावी ‘उष्णजल’ रखडले

By admin | Published: April 26, 2015 10:14 PM2015-04-26T22:14:25+5:302015-04-27T00:11:56+5:30

संशोधन अद्याप नाहीच : तात्पुरत्या उपाययोजनेसाठी बाष्पजलाचा पर्याय

'Heat' due to fruit failure | फळमाशीअभावी ‘उष्णजल’ रखडले

फळमाशीअभावी ‘उष्णजल’ रखडले

Next

रत्नागिरी : युरोपीय देशांमधील आंबा आयातीवरील बंदी उठावी, यासाठी हाती घेण्यात आलेले उष्णजल प्रक्रियेचे संशोधन अजूनही रखडलेलेच आहे. उष्णजल संशोधनासाठी अजून फळमाशीची प्रतीक्षाच आहे. यावर तात्पुरता पर्याय म्हणून बाष्पजल प्रकिया करून आंबा निर्यात सुरू आहे.गोडी, चव, स्वाद, रंग, आकार अशा गुणवैशिष्ट्यामुळे कोकणातील हापूस आंब्याला राष्ट्रीयच नाही तर आंतरराष्ट्रीय बाजारातही मोठी मागणी आहे. मात्र, हापूसवर फळमाशीचा प्रादुर्भाव असल्याच्या कारणामुळे गतवर्षी युरोपीय देशांनी हापूसची आयात करण्यास नकार दिला. युरोपीय बाजारपेठ अलिकडच्या काही वर्षातच हापूसला खुणावू लागली आहे. तेथे दरही चांगला मिळत असल्याने निर्यातदारांचा त्याकडे बराच कल आहे. त्यामुळे फळमाशीचा प्रादुर्भाव हा विषय गांभीर्याने घेण्यात आला आणि त्यावर तोडगा काढण्यासाठी या प्रश्नावर संशोधन सुरू करण्यात आले.आंब्यावर ४८ अंश सेल्सियस उष्णजल प्रक्रिया एक तास केल्यास फळमाशीच्या अळ्या मरून जातात, असे मत संशोधकांनी नोंदवले होते. बैंगनपल्ली, बदामी, तोतापुरी, केशरसारख्या जातीच्या आंब्याची साल जाड असल्याने या आंब्यासाठी ही प्रक्रिया योग्य आहे. मात्र, हापूस आंब्याची साल पातळ असल्याने संबंधित प्रक्रियेमुळे हापूसच्या दर्जावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पणन मंडळामध्ये संशोधन सुरू करण्यात आले आहे.वास्तविक एप्रिलअखेरीस फळमाशीचा प्रादुर्भाव होतो. परंतु मार्चपासून संशोधन सुरू करण्यात आल्याने आधी फळमाशी तयार करणे गरजेचे होते. त्यासाठी पेरू आणून ते सडविण्यात आले आहेत. मात्र फळमाशी अद्याप अंडकोषात असल्यामुळे संशोधन अपूर्ण राहिले आहे. संशोधकांना आता अंडकोशातून बाहेर पडणाऱ्या फळमाशीची प्रतीक्षा लागून राहिली आहे. त्यामुळे हे संशोधन रखडले आहे. याप्रश्नावर हवी तशी ठोस उपाययोजना न केल्याने हे संशोधन रखडल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.युरोपीय देशांनी यावर्षी अटी ठेवत आयातीवरील बंदी उठवली. आयातीसाठी उष्णजल प्रक्रियेला सुरूवातीला मान्यता देण्यात आली होती. मात्र, संशोधन पूर्ण होऊ शकलेले नसल्याने बाष्पजल प्रक्रियेला मान्यता देण्यात आली आहे. वाशी येथे बाष्पजल प्रक्रिया युनिट आहे. वाशीतून युरोपला आंबा पाठवताना बाष्पजल प्रक्रिया करून पाठवली जात आहे.मॉरिशस, न्यूझीलंड, युरोप, अमेरिका, जपान आदी देशांतून आंब्याला मागणी होत आहे. मात्र, अवकाळीमुळे जिल्ह्यातील २० हजार ५१८.३० हेक्टर क्षेत्रावरील आंबापीक नष्ट झाले. शिवाय अद्याप अधूनमधून पडत असलेल्या पावसामुळेही आंबा पिकावर परिणाम होत आहे. निर्यातीला मागणी असूनही त्या प्रमाणात पुरवठा होत नाही. त्यामुळे हापूसला मागणी जास्त आणि उत्पादन कमी, अशी अवस्था
आहे.
उष्णजल प्रक्रिया अहवाल लांबल्याने बाष्पजल प्रक्रिया ग्राह्य धरली जात आहे. एप्रिल अखेरीस किंवा मेच्या पहिल्या आठवड्यापर्यंत उष्णजलचा अहवाल प्राप्त होण्याची शक्यता आहे. त्यानंतर याबाबतची प्रक्रिया पुढे जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)


बाष्पजल प्रक्रिया म्हणजे काय?
बाष्पजल प्रक्रियेमध्ये साडेसत्तेचाळीस अंश सेल्सियस इतके तापमान आंब्यास दिले जाते. नंतर थंड पाण्याद्वारे तापमान खाली आणले जाते. त्यामुळे फळमाशीच्या अळ्या मरून जातात. वाशी मार्केटमधील आंब्यावर उष्णजल प्रक्रिया करून आंबा युरोपीय देशात पाठवण्यात येत आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गतूनही युरोपला आंबा पाठवताना उष्णजल प्रक्रिया करून पाठवण्यात येत आहे.

Web Title: 'Heat' due to fruit failure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.