अतिवृष्टीचा हजारो एकर क्षेत्रातील काजू कलमांना मोठा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 03:13 PM2019-09-16T15:13:40+5:302019-09-16T15:18:02+5:30

गेल्या महिन्यात तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी तसेच हवेतील गारव्याचा फटका येथील हजारो काजू कलमांना बसला असून उत्पन्न देण्यासाठी तयार असलेल्या हजारो एकरातील काजू कलमांच्या फांद्या तसेच पाने करपू लागल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे. त्यामुळे काजू शेतकरी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत.

 A heavy blow to the heavy cashew nuts just cut off the branches, leaves and leaves | अतिवृष्टीचा हजारो एकर क्षेत्रातील काजू कलमांना मोठा फटका

अतिवृष्टीचा हजारो एकर क्षेत्रातील काजू कलमांना मोठा फटका

Next
ठळक मुद्देअतिवृष्टीचा हजारो एकर क्षेत्रातील काजू कलमांना मोठा फटकाकलमांच्या फांद्या, पाने करपली; शेतकऱ्यांमध्ये घबराट

सावंतवाडी : गेल्या महिन्यात तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी तसेच हवेतील गारव्याचा फटका येथील हजारो काजू कलमांना बसला असून उत्पन्न देण्यासाठी तयार असलेल्या हजारो एकरातील काजू कलमांच्या फांद्या तसेच पाने करपू लागल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे. त्यामुळे काजू शेतकरी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत.

यावर्षी तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. त्यामुळे येथील भातशेतीसह सर्वच पिकांचे मोठे नुकसान झाले. अतिवृष्टीचा फटका काजूबागांना बसला असून मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने तसेच हवेतील गारव्याचा परिणाम काजू बागांवर झाला आहे.

काजू कलमांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला असून पूर्ण वाढ झालेल्या हजारो एकरातील काजू कलमांच्या बागा करपू लागल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. यावर्षी काजू बियांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटणार असून शेतकºयांना मात्र मोठ्या नुकसानीस सामोरे जावे लागणार आहे.

अलीकडच्या काळात काजू पीक जिल्ह्याचा आर्थिक कणा बनत चालले आहे. कमी वेळात व कमी खर्चात हमखास उत्पन्न देणारी शाश्वत शेती म्हणून काजू पिकाबद्दल शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आकर्षण निर्माण झाले होते. परिणामी येथील शेतकऱ्यांसोबत मध्यमवर्गानेदेखील मेहनत व लाखो रुपये खर्च करून हजारो कलमांच्या बागा फुलवल्या आहेत.

मात्र, अतिवृष्टीमुळे काजू कलमांना विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला असून, कलमांच्या फांद्या तसेच पाने अचानक वाळू लागल्याने काजू कलमांचे मळे ओसाड होत चालले आहेत. त्यामुळे येथील शेतकरी संकटात सापडला आहे.

कृषी विभागाकडे मात्र या रोगावर कोणत्या उपाययोजना कराव्यात या संदर्भात कोणतीच माहिती उपलब्ध नाही. या संदर्भात निरीक्षण व उपाययोजना करण्यासाठी काही दिवसांपूर्वी कृषी विभागाकडून एक पथक ओटवणे दशक्रोशीत आल्याचे समजते.

मात्र, काजू कलमांना झालेल्या रोगाच्या प्रादुर्भावासंदर्भात कोणतीही चर्चा या पथकाने शेतकऱ्यांसोबत केली नाही. तसेच उपाययोजनांसंदर्भात कोणतीच माहिती दिली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कोकणातील शेतकऱ्यांच्या या मुलभूत प्रश्नाकडे शासनकर्त्यांनी लक्ष देण्याची मागणी यानिमित्ताने केली जात आहे.

काजू उत्पन्नावर वर्षभराची आर्थिक गणिते

काजू उत्पन्न हे येथील शेतकऱ्यांचा आर्थिक कणा असून काजू उत्पादनातून दरवर्षी येथील शेतकरी मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल करतो. काजू उत्पन्नावर शेतकऱ्याची वर्षभराची आर्थिक गणिते अवलंबून असतात. मात्र, काजू बागांवर कोसळलेल्या संकटामुळे शेतकऱ्यांची सर्व आर्थिक गणिते कोलमडणार आहेत. शासनाने त्वरित उपाययोजना न केल्यास तसेच शेतकऱ्यांना योग्य ती माहिती न दिल्यास येथील काजू शेतकरी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत.

काजू कलमे उद्ध्वस्त, शेतकरी हतबल

यावर्षी झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. येथील बागबागायतींसोबत काजू कलमांच्या फांद्या तसेच पाने मोठ्या प्रमाणात जळाल्यामुळे मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. पाच ते सहा वर्षे मेहनतीने मोठी केलेली काजू कलमे उद्ध्वस्त होत असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. शासनाने वेळीच लक्ष घालण्याची व उपाययोजना संदर्भात माहिती देण्याची गरज आहे, असे मत काजू बागायतदार विठ्ठल सावंत यांनी व्यक्त केले.

Web Title:  A heavy blow to the heavy cashew nuts just cut off the branches, leaves and leaves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.