सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर कायम; ६३ नागरिकांचे स्थलांतर
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: July 20, 2024 07:03 PM2024-07-20T19:03:52+5:302024-07-20T19:05:29+5:30
दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक पाऊस
गिरीश परब
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आठवड्याभराच्या कालावधीनंतरही मुसळधार पावसाचे सत्र कायम आहे. ग्रामीण भागातील पुलांवर पाणी आल्याने विविध रस्ते बंद झाले होते. परिणामी, अनेक राज्ये, तसेच जिल्हा मार्गावरील वाहतूक अधूनमधून ठप्प होत आहे. मुसळधार पावसामुळे आणि खचत असलेल्या डोंगर भागापासून सद्यस्थितीत जिल्ह्यात १३ कुटुंबांतील ६३ नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. दरम्यान, शनिवारी सकाळी दहा वाजेपर्यंत ५२.७ च्या सरासरीने पाऊस झाला असून, सर्वाधिक ८२.२ मिलीमीटर पाऊस दोडामार्ग तालुक्यात झाला आहे.
गेल्या आठवड्याभरापासून हवामान खात्याच्या अलर्टनुसार जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. गुरुवारी मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढला असून तो अद्यापही कायम आहे. सह्याद्री पट्ट्यात मुसळधार पाऊस झाल्याने जिल्ह्यातील प्रमुख पाच नद्यांना पूरस्थितीचे स्वरूप प्राप्त झाले होते. ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांवर अधून मधून पाणी येत असल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प होत होती.
२४ तासांत झालेला पाऊस
शनिवारी सकाळी दहा वाजेपर्यंत जिल्ह्यात ५२.७ च्या सरासरीने पाऊस झाला. यामध्ये देवगड तालुक्यात ५३ मिलीमीटर पाऊस, मालवणमध्ये ३४.४ सावंतवाडीमध्ये ६६.८, वेंगुर्ला मध्ये ५४.१ मिलीमीटर, कणकवलीमध्ये सर्वाधिक ४६.८ मिलिमीटर पाऊस झाला, कुडाळमध्ये ५३.३ मिलीमीटर पाऊस, वैभववाडीमध्ये ५०.८, तर दोडामार्गमध्ये ८२.२ मिलीमीटर पाऊस झाला.
आजपर्यंत झालेले नुकसान
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आतापर्यंत प्रत्येकी ३ सार्वजनिक व खासगी मालमत्तेचे नुकसान झाले आहे. पक्की घरे १७, कच्ची घरे ३ पूर्णतः नुकसान झाले असून, ४०८ पक्क्या घरांचे, २०० कच्चा घरांचे, गोठा ११, पोल्ट्री १, २८ मांगरांचे अंशतः नुकसान झाले आहे. १४ दुधाळ जनावरे, १ ओढकाम करणारे जनावर आणि ३,१९५ कोंबड्या पुराच्या पाण्यामुळे मृत झाल्या आहेत.