शेतकरी चिंतेत; सिंधुदुर्गात मुसळधार पावसामुळे भातशेती जमीनदोस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2019 01:05 PM2019-10-25T13:05:13+5:302019-10-25T13:09:29+5:30
गेले दोन-तीन दिवस संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे.
सिंधुदुर्ग - गेले दोन-तीन दिवस संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. दरम्यान गुरूवारी रात्रीपासून पावसाचे प्रमाण अधिकचं वाढले आहे. तर शुक्रवारी सकाळपासून पावसाची संततधार कायम राहीली आहे. या पावसाचा भात शेती वर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. भात शेती जमीन-दोस्त होऊन पाण्याखाली गेल्यामुळे भाताला “अंकुर” फुटण्यास सुरुवात झाली आहे. या सर्व परस्थितीत जिल्ह्यात ओला दुष्काळ पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र विधानसभेच्या धामधुमीत याकडे लोकप्रतिनिधी व प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे शेतकरी बांधवामधून कमालीची नाराजी व्यक्त होत आहे.
यावर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस आल्यामुळे काही ठिकाणी महाप्रलय आला होता यात अनेकांचे संसार शेती पाण्याखाली गेली होती. दरम्यान, नंतर या पावसाने विश्रांती घेतल्यानंतर या सगळ्या परिस्थितीतून स्वतः ला सावरत लोकांनी सुटकेचा निश्वास टाकला होता. पाऊस कमी झाल्यानंतर सनईच्या हंगामात पुन्हा दमदार पाऊस सुरू झाल्यामुळे हातातोंडाशी आलेली भात शेती पाण्याखाली गेली आहे. तर शेती जमीन दोस्त झाल्यामुळे भात पिकाला अंकुर फुटण्यास सुरुवात झाली आहे पावसाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे मात्र, विधानसभेच्या धामधुमीत या बळीराजाकडे लक्ष देण्यासाठी सरकार कमी पडल्यामुळे शेतकरी बांधवा मधून कमालीची नाराजी व्यक्त होत आहे.