Video- सिंधुदुर्गात गडगडाटासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, वादळी वाऱ्यामुळे वीज, दूरध्वनी सेवा ठप्प
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2019 07:53 AM2019-06-06T07:53:25+5:302019-06-06T07:53:39+5:30
वेधशाळेचा अंदाज चुकवत मिरगाच्या म्हणजे ७ जूनच्या एक दिवस अगोदर सिंधुदुर्गात पावसाने गुरुवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास धूमधडाक्यात आपली हजेरी लावली.
सिंधुदुर्ग: सिंधुदुर्गात मान्सूनपूर्व सरी कोसळल्या आहेत. सिंधुदुर्गातील काही भागात पावसाने गुरुवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास धूमधडाक्यात आपली हजेरी लावली. यावेळी मोठमोठ्या गडगडाटासह जोरदार वादळी वारे वाहत होते, अशा परिस्थितीत तब्बल अर्धा तास पाऊस कोसळला. त्यामुळे परिसरात नुकसान झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. गेले चार दिवस अंगाची मोठ्या प्रमाणात काहिली होत होती, त्यामुळे पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.
7 जूनला केरळ येथे मान्सून दाखल होणार असल्याचे वृत्त वेधशाळेने वर्तवले होते. त्यामुळे येणाऱ्या पाच ते सहा दिवसांत हा पाऊस कोकणात येण्याची शक्यता होती. परंतु गुरुवारी सकाळीच मान्सूनपूर्व पावसाने मोठ्या गडगडाटासह वादळी वाऱ्यासह आपली हजेरी दर्शविली. तासभर पाऊस झाल्यामुळे अनेक ठिकाणी निर्माण झालेल्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात संपुष्टात येण्याची शक्यता आहे.
आकेरीत मुंबई-गोवा मार्गावर कोसळले झाड
सावंतवाडीसह अन्य भागात पावसाने गुरुवारी विजेच्या कडकडाटासह पहाटेच हजेरी लावली. वारा आणि पाऊस जोरदार सुरू झाल्याने मुंबई-गोवा मार्गावर आकेरी हेळ्याचे गाळू परिसरात मोठे झाड कोसळले. हे झाड जुने असल्याने ते कोसळल्याचे निदर्शनास येते आहे. झाड कोसळल्याने सावंतवाडीहून कुडाळकडे जाणारी वाहतूक व कुडाळहून सावंतवाडीकडे जाणारी वाहतूक खोळंबली आहे. काही वाहने आता आकेरी तिठ्यावरुन झाराप-पत्रादेवी महामार्गाच्या दिशेने मार्गस्थ होत कुडाळच्या दिशेने जात होती.कणकवलीत बत्ती गुल
कणकवली शहर आणि परिसरात सकाळी साडेसहा पासून वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. ढगांचा गडगडाट होत असल्याने landline आणि मोबाईल सेवा ठप्प झाली आहे. तसेच बीएसएनएल आणि इतर कंपन्यांच्या दूरध्वनी सेवा देखील ठप्प झाल्या आहेत. त्याचबरोबर वीज गायब झाल्याने नागरिकांची पळापळ झाली.