Sindhudurg: दोडामार्गात मुसळधार, पणतुर्लीत सार्वजनिक विहीर कोसळल्याने पाणीटंचाई
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: September 30, 2023 06:05 PM2023-09-30T18:05:58+5:302023-09-30T18:06:16+5:30
दोडामार्ग : गणेशोत्सवाच्या मागच्या काही दिवसांत रिमझिम बरसणाऱ्या पावसाने चांगलाच जोर धरला आहे. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर धुवाधार कोसळणाऱ्या पावसाने दोडामार्ग ...
दोडामार्ग : गणेशोत्सवाच्या मागच्या काही दिवसांत रिमझिम बरसणाऱ्या पावसाने चांगलाच जोर धरला आहे. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर धुवाधार कोसळणाऱ्या पावसाने दोडामार्ग तालुक्याला चांगलेच झोडपून काढले. परिणामी पणतूर्ली येथील सार्वजनिक विहीर या संततधार पावसात कोसळली. पहाटेच्या सुमारास ही दुर्घटना घडल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र ऐन पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे.
गणेशोत्सवाच्या काळात तालुक्यात पावसाच्या हलक्या सरी कोसळत होत्या. मात्र जोर नव्हता त्यामुळे भातशेतीला पुरेसा पाऊस नसल्याने शेतकरी मात्र चिंतेत होता. काही ठिकाणी तर चक्क बाप्पालाच समाधानकारक पाऊस होऊ दे म्हणून साकडे घालण्यात आले होते. अखेर बाप्पाने शेतकऱ्यांवर कृपादृष्टी केली असून तालुक्यात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. त्यामुळे शेतकरी मात्र सुखावला आहे.
शुक्रवारी मध्यरात्रीनंतर तालुक्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळला. तळेखोल - विर्डी परिसरात वादळी वाराही झाला. या धुव्वाधार पावसाचा फटका पणतूर्ली येथील सार्वजनिक विहिरीला बसला. शनिवारी पहाटेच्या सुमारास गावकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्याचा एकमेव स्रोत असलेली सार्वजनिक विहीर कोसळली. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची मोठी गैरसोय निर्माण झाली असून गावकऱ्यांना कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. सुदैवाने विहीर पहाटेच्या सुमारास कोसळली अन्यथा दिवसा दुर्घटना घडली असती तर मोठा अनर्थ घडला असता.