वैभववाडीत मुसळधार पाऊस, नाधवडेत झाड कोसळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 11:15 AM2019-06-21T11:15:14+5:302019-06-21T11:17:03+5:30
आठवडाभराच्या विश्रांतीनंतर परतलेल्या पावसामुळे बळीराजा सुखावला आहे. मात्र, दुपारनंतर मुसळधार पडणाऱ्या पावसाचा वैभववाडीच्या आठवडा बाजाराला चांगलाच फटका बसला. बाजारातील भाजी, कापड, व शैक्षणिक साहित्य विक्रेत्यांचे या पावसामुळे नुकसान झाले.या पावसाचा घाटमार्गांवर परिणाम झालेला नाही. मात्र, नाधवडे धरणानजीक झाड कोसळल्याने सायंकाळी वैभववाडी-तळेरे मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
वैभववाडी : आठवडाभराच्या विश्रांतीनंतर परतलेल्या पावसामुळे बळीराजा सुखावला आहे. मात्र, दुपारनंतर मुसळधार पडणाऱ्या पावसाचा वैभववाडीच्या आठवडा बाजाराला चांगलाच फटका बसला. बाजारातील भाजी, कापड, व शैक्षणिक साहित्य विक्रेत्यांचे या पावसामुळे नुकसान झाले.या पावसाचा घाटमार्गांवर परिणाम झालेला नाही. मात्र, नाधवडे धरणानजीक झाड कोसळल्याने सायंकाळी वैभववाडी-तळेरे मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
मृग नक्षत्र सुरू झाल्यावर २ ते ३ दिवसांनी समाधानकारक पाऊस झाल्याने भात पेरणी उरकण्यात आली. परंतु, पेरणीनंतर पावसाने दडी मारल्याने बळीराजाची चिंता वाढली होती. पेरणी होऊन आठवडा मागे पडला तरी पाऊस परतला नसल्याने दुबार पेरणीचे संकट ओढवते की काय? अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले होते.
मात्र, मंगळवारी सायंकाळी हा पाऊस परतला. परंतु, त्यामध्ये जोर नव्हता. बुधवारी सकाळी पाऊस जोर धरण्याची चिन्हे दिसत होती. त्याप्रमाणे सकाळच्या सत्रात २ ते ३ मोठ्या सरी कोसळल्या. दुपारी तीननंतर मुसळधार पावसाला सुरुवात होताच आठवडा बाजारातील व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली. रस्त्यावरील पावसाचे पाणी काही प्रमाणात दुकानांमध्ये घुसल्यामुळे भाजी, कपडे व्यापाऱ्यांचे काही प्रमाणात नुकसान झाले.
जिल्ह्यात सरासरी ११.३७ मिलीमीटर पाऊस
सिंधुदुर्गात गेल्या चोवीस तासात सरासरी ११.३७ मिलीमीटर पाऊस झाला. तालुकानिहाय सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासात झालेला पाऊस पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी आतापर्यंत झालेल्या एकूण सरासरी पावसाची आहे. दोडामार्ग ३४ (१९७), सावंतवाडी ०३ (११८), वेंगुर्ले ०१ (१३२), कुडाळ ०९ (१९४), मालवण ०१ (१३३), कणकवली २३ (२०२), देवगड ०३ (१२५), वैभववाडी १७ (१८२) पाऊस झाला आहे.
विजांचा कडकडाट
पावसादरम्यान विजांचा कडकडाटही सुरू होता. पावसाचा जोर वाढल्यामुळे बहुतांश नद्या-नाले रात्रीपर्यंत प्रवाहित होण्याची शक्यता आहे. करूळ आणि भुईबावडा दोन्ही घाटमार्ग सुरळीत होते. मात्र, नाधवडे धरणानजीक झाड कोसळल्याने वैभववाडी-तळेरे मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने काही वेळाने एकेरी वाहतूक सुरू केली. त्यानंतर रस्त्यावरील झाड हटविण्याचे काम सुरू होते.