कणकवलीत पावसाची जोरदार हजेरी, महामार्ग चिखलमय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 03:32 PM2019-07-31T15:32:32+5:302019-07-31T15:42:20+5:30
कणकवली शहरासह तालुक्यात गेला आठवडाभर जोरदार पाऊस बरसत आहे. रविवारी सकाळपासून पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली. त्यामुळे सखल भागात व रस्त्यांवरील खड्ड्यांत ठिकठिकाणी पाणी साचले असून मुंबई-गोवा महामार्ग पुन्हा चिखलमय झाला आहे. या चिखलापासून आपली कोणी सुटका करील का? असा प्रश्न कणकवलीतील नागरिकांकडून विचारला जात आहे.
कणकवली : कणकवली शहरासह तालुक्यात गेला आठवडाभर जोरदार पाऊस बरसत आहे. रविवारी सकाळपासून पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली. त्यामुळे सखल भागात व रस्त्यांवरील खड्ड्यांत ठिकठिकाणी पाणी साचले असून मुंबई-गोवा महामार्ग पुन्हा चिखलमय झाला आहे. या चिखलापासून आपली कोणी सुटका करील का? असा प्रश्न कणकवलीतील नागरिकांकडून विचारला जात आहे.
रविवारी सकाळी पावसाने पुन्हा जोर धरला. काही काळ ढगाळ वातावरण होते. दिवसभर अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या. रात्री उशिरापर्यंत हा पाऊस पडत होता. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता.
सध्या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असल्याने अनेक ठिकाणी मातीचा भराव करण्यात आला आहे. त्यातच महामार्गाच्या शेजारी गटारे बांधण्यात न आल्याने पावसाचे चिखलमिश्रित पाणी रस्त्यावर येत आहे.
पाऊस थांबल्यावर रस्त्यावर पसरलेला चिखल काहीसा सुकत आहे. मात्र, या चिखलामुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालणे कठीण होऊन बसले आहे. तर वाहनचालकांना रस्त्यावरून वाहने चालविताना कसरत करावी लागत आहे. रस्त्यावरील खड्डे व चिखलामुळे अनेक पादचारी पाय घसरून पडण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे या त्रासापासून आपल्याला कोण सोडविल का? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
महामार्ग चौपदरीकरणाचे काम करणारा ठेकेदार या समस्येकडे लक्ष देत नाही. तर प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे त्रस्त नागरिकांना पुन्हा एकदा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही, अशी प्रतिक्रिया अनेक नागरिक व्यक्त करताना दिसत आहेत.
नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर; तरुणाईने लुटला पर्यटनाचा आनंद
महामार्गाचे काम करीत असताना गटारे तयार करण्यात न आल्याने ठिकठिकाणी पाणी साचत आहे. काही विहिरींमध्ये हे पाणी जात असल्याने विहिरींचे पाणी दूषित झाले आहे. तर ड्रेनेजचे दुर्गंधीयुक्त पाणी महामार्गावर पसरल्याने त्यातून चालत जात असल्याने पादचाऱ्यांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
वातावरणात गारवा पसरला असून तापाचे अनेक रुग्ण ठिकठिकाणी आढळून येत आहेत. त्यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. रविवारी जोरदार पाऊस पडत असल्याने तरुणाईने धबधबे तसेच कासारटाका यासारख्या ठिकाणी जाऊन पर्यटनाचा आनंद लुटला. शहरातील चिकन सेंटरवर ग्राहकांची गर्दी सकाळपासूनच दिसून येत होती.