पहिला पाऊस... आंबोलीत पावसाची जोरदार हजेरी, पर्यटक सुखावले, हवेत गारवा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2022 08:45 PM2022-05-11T20:45:18+5:302022-05-11T21:23:57+5:30
वीस मिनिटे बरसला : पर्यटक सुखावले, हवेत गारवा
आंबोली (सिंधुदुर्ग) : गेले पंचवीस दिवस महाराष्ट्रातील चेरापुंजी म्हणून प्रसिद्ध असलेल्या सिंधुदुर्गातील थंड हवेचे ठिकाण असलेल्या आंबोलीमध्ये रोज सकाळी व रात्री धुके पडत आहेत. त्यात भर म्हणून बुधवारी सायंकाळी सात वाजता जवळपास वीस मिनिटे धो-धो पाऊस कोसळला. त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला होता. तर उन्हाळी पर्यटनासाठी आंबोलीत असलेल्या पर्यटकांना सुखद धक्काच बसला.
ऐन गरमीच्या हंगामात कोसळणाऱ्या संततधार पावसाची मजा पर्यटकांनी लुटली; मात्र या अवकाळी पावसाने जिल्ह्यात शेवटच्या टप्प्यात असलेला आंबा हंगाम अडचणीत येणार आहे. दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सूर्यदर्शन फार कमी झाले आहे. हवेेतील उष्णतेचे प्रमाण कमालीचे वाढले होते. अंगाची लाहीलाही होत असताना आता अवकाळी पाऊस बरसण्याची चिन्हे होती. दरम्यान, कणकवलीसह जिल्ह्यात सायंकाळी पावसाने हजेरी लावली.
दरवर्षी मे महिन्यात पाऊस
दाट धुके, धो-धो पाऊस पर्यटकांची धम्माल मस्ती चोहोबाजूने दाट धुके आणि धो-धो पाऊस यामुळे या मार्गावरून ये-जा करणारे पर्यटक सुखावले होते. धुके आणि पावसाचा खेळ पाहण्यासाठी घाटामध्ये पर्यटक थांबून या पावसाचा आनंद घेत होते. आंबोलीमध्ये दरवर्षी मे महिन्यात पावसाची हजेरी लागते. त्याच पद्धतीने याहीवर्षी हजेरी लागली आहे. हा पाऊस आणखी काही दिवस पडेल असे जाणकारांचे मत असून जूनच्या दहा तारखेपासून खऱ्या अर्थाने आंबोलीचा पाऊस सुरू होणार आहे.