आचरा दशक्रोशीला पावसाने झोडपले; शिवापूर बंधारा गेला वाहून, घरात पाणी आल्याने ग्रामस्थांचे स्थलांतर
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: July 9, 2024 02:10 PM2024-07-09T14:10:12+5:302024-07-09T14:12:14+5:30
सिद्धेश आचरेकर आचरा : जूनमध्ये हुलकावणी दिलेल्या पावसाने जुलैच्या पहिल्या आठवड्यात जिल्हाभर दाणादाण उडवली. यात मालवण तालुक्याला पावसाने सलग ...
सिद्धेश आचरेकर
आचरा : जूनमध्ये हुलकावणी दिलेल्या पावसाने जुलैच्या पहिल्या आठवड्यात जिल्हाभर दाणादाण उडवली. यात मालवण तालुक्याला पावसाने सलग दोन दिवस झोडपून काढले. तालुक्यातील आचरा दशक्रोशीला मोठा फटका बसला. आचरा, चिंदर, वायंगणीसह अन्य गावांमध्ये परिस्थिती निर्माण झाली. रविवार आणि सोमवारी नॉनस्टॉप पडलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. आचरा हिर्लेवाडी, गाऊडवाडी, ख्रिश्चनवाडी, पिरावाडी येथील घरांमध्ये पाणी घुसले. ख्रिश्चनवाडीतील ग्रामस्थांनी लगतच्या घरांचा आसरा घेतला. तर काहींची काझीवाडा वाचनालयात व्यवस्था करण्यात आली.
सोमवारी रात्री ढगफुटीसदृश कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे आचरा परिसराला चांगलेच झोडपले. आचरा गाऊडवाडी, हिर्लेवाडी, चिंदर, सडेवाडी परिसर जलमय झाल्यामुळे अनेकांच्या घरात पाणी घुसले. हिर्लेवाडी गाऊडवाडी परिसरात मंगळवारी सकाळी उशिरापर्यंत रस्त्यावर पाणी साचून राहिल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. गाऊडवाडी भागात ग्रामपंचायत परिसर पूर्णतः जलमय बनला होता.
रस्त्यावर चार ते पाच फूट पाणी
हिर्लेवाडी भागालाही पावसाचा मोठा फटका बसला. सोमवारी दिवसभर पाऊस सुरू असल्याने सायंकाळी साडेसात वाजल्यापासून हिर्लेवाडीला पाण्याने विळखा घातला. रात्री पाण्याचा वेग वाढला. पुरुषोत्तम पेडणेकर, गोरखनाथ पेडणेकर, अश्विन हळदणकर, राजू पेडणेकर यांच्या घरात पाणी गेले होते. घरातील सामान अन्नधान्य भिजून नुकसान झाले आहे. ब्राह्मणदेव मंदिर परिसर देखील जलमय झाला होता. रस्त्यावर चार ते पाच फूट पाणी आले होते.
पतन विभागाच्या बंधाऱ्याला फटका
हिर्लेवाडी येथील पतन विभागाच्या शिवापूर बंधाऱ्यालाही याचा फटका बसला. पाण्याच्या झोताबरोबर पुलाचे काही क्षणातच दोन भाग झाले. या परिसरात तौक्ते वादळासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. आचरा गाऊडवाडी येथील सायमंड फर्नाडिस, जाकारीयस फर्नाडिस (गुरुजी), बेन्तु फर्नाडिस, सिल्वेस्टर फर्नाडिस, पीटर फर्नाडिस, साल्वादर मिरीन्डा लॅन्सी फर्नाडिस आदींसह सर्व ख्रिश्चनवाडीतील घरात पाणी घुसल्याने येथील काहींनी लगतच्या स्लॅबच्या घराचा आसरा घेतला होता. तर काहींना काझीवाडा वाचनालयात हलविण्यात आले होते. गाऊडवाडी येथील माजी उपसरपंच अनिल करंजे, ग्रामपंचायत कार्यालय आचराच्या दरवाजापर्यंत रात्री पाणी आले होते. पारवाडीला पावसाचा फटका बसला. मंगळवारी पावसाने विश्रांती घेतल्याने परिस्थिती नियंत्रणात येत आहे.
चिंदर सडेवाडीत घरांमध्ये पाणी घुसले
मुसळधार पावसाने चिंदर सडेवाडी परीसराला फटका बसला. येथील बच्चू सद्गुरू यांच्या वाहनांमध्येही पाणी घुसल्याने वाहनांचे नुकसान झाले आहे. तर सुधीर मसुरकर, मोहन गोलतकर, उल्हास, वनिता वराडकर यांच्या घरात पाणी घुसले होते. यात मसुरकरव्यतिरिक्त अन्य घरे बंद असल्याचे समजते. याबाबत मंगळवारी मंडल अधिकारी अजय परब, तलाठी संतोष जाधव, पोलिस पाटील जगन्नाथ जोशी यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली.