वादळी पावसाने झोडपले
By admin | Published: June 6, 2014 12:04 AM2014-06-06T00:04:52+5:302014-06-06T00:10:09+5:30
सिंधुदुर्ग जिल्ह्यात २८.६३ मि. मी. पाऊस : घरावर झाडे कोसळून दीड लाखांचे नुकसान
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात बुधवारी रात्री वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडला. २८.६३ मि.मी.च्या सरासरीने पडलेल्या पावसामुळे व वादळी वार्यामुळे विविध ठिकाणी घरांवर झाडे पडून सुमारे १ लाख २९ हजार ७६० रुपयांचे नुकसान झाले असल्याची नोंद जिल्हा प्रशासनाकडे झाली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार सुरुवात केली आहे. जिल्ह्यात १ जूनपासून आतापर्यंत एकूण सरासरी ५०.२५ मि. मी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. सर्वात जास्त मालवण तालुक्यात १२८ मि. मी. एवढा तर सर्वात कमी वैभववाडी तालुक्यात १९ मि. मी. एवढा पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. तसेच अन्य तालुक्यात दोडामार्ग ६० मि. मी., सावंतवाडी ४४ मि. मी., वेंगुर्ला २७ मि.मी., कुडाळ ७१ मि.मी., कणकवली २३ मि.मी. तर देवगड तालुक्यात आतापर्यंत ३० मि.मी. पाऊस पडला आहे.
बुधवारी रात्री प्रचंड विजेचा कडकडाट आणि वादळी वार्यासह जोरदार पाऊस पडला. यामुळे जिल्ह्यातील विद्युत यंत्रणा पूर्णपणे कोलमडली होती तर काही ठिकाणी रस्त्यावर झाडे उन्मळून पडल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. घरांवर झाडे पडून घरांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. बुधवारी जिल्ह्यात २८.६३ च्या सरासरीने पाऊस कोसळला. यामध्ये देवगड २० मि. मी., वैभववाडी १ मि. मी., कणकवली ७ मि. मी., कुडाळ ४६ मि.मी., सावंतवाडी ३३ मि. मी., मालवण १०८ मि. मी., वेंगुर्ला १४ मि. मी. तर दोडामार्ग तालुक्यात पाऊस पडलेला नाही. बुधवारी सावंतवाडी आणि वेंगुर्ला तालुक्यांना वादळी वार्याचा तडाखा बसला. या वादळी वार्यामुळे घरांचे सुमारे १ लाख २९ हजार ७६० रुपयांचे नुकसान झाले. यामध्ये वेंगुर्ला तालुक्यातील यशवंत संभाजी पराडकर यांच्या घरावर पिंपळाचे झाड पडून ९८ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तर सावंतवाडी तालुक्यात एकूण ११ घरांची अंशत: पडझड होऊन नुकसानी झाली. यामध्ये लक्ष्मण सावंत यांच्या घराचे ३६२० रुपयांचे नुकसान झाले आहे. गोपाळ सावंत २९२० रुपये, पार्वतीबाई घोगळे २४०० रुपये, वसंत सावंत २७८० रुपये, आत्माराम सावंत १५०० रुपये, विश्राम सावंत ३ हजार रुपये, सखाराम सावंत-भोसले १५०० रुपये, बापू तांबोळकर ८ हजार रुपये, भगवान सावंत २ हजार रुपये, अक्षता देसाई २५०० रुपये आदी नुकसान झाल्याची नोंद जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे झाली आहे. (प्रतिनिधी)