वैभववाडी तालुक्यात मुसळधार पाऊस : विद्यामंदिर अर्ध्यावर सोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2018 04:20 PM2018-07-06T16:20:53+5:302018-07-06T16:24:18+5:30
वैभववाडी तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू झाला. पुराचे पाणी सोनाळीतील अभिनव विद्यामंदिरच्या आवारात घुसल्याने शाळा व्यवस्थापनाची तारांबळ उडाली. त्यामुळे अर्ध्यावर शाळा सोडण्यात आली.
वैभववाडी : तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू झाला. पुराचे पाणी सोनाळीतील अभिनव विद्यामंदिरच्या आवारात घुसल्याने शाळा व्यवस्थापनाची तारांबळ उडाली. त्यामुळे अर्ध्यावर शाळा सोडण्यात आली.
तर खारेपाटण-गगनबावडा राज्य महामार्गावर तिरवडे खिंडीत झाड कोसळून तासभर वाहतूक ठप्प झाली होती. करुळ आणि भुईबावडा घाटात किरकोळ दगड पडले; मात्र वाहतूक सुरळीत होती.
सोनाळी येथील अभिनव विद्यामंदिरच्या प्रांगणात पुराचे पाणी आल्यामुळे शाळा व्यवस्थापनाची तारांबळ उडाली.
मुसळधार पावसामुळे तालुक्यातील नद्यानाले दुथडी वाहत आहेत. सकाळी ११ च्या सुमारास पावसाची मोठी सर कोसळल्याने पुराच्या पाण्याचा अभिनव विद्यामंदिरच्या इमारतीला वेढा पडून व्हरांड्यापर्यंत पाणी पोचले होते. त्यामुळे शाळा व्यवस्थापनाची तारांबळ उडाली.
पावसाचा जोर वाढू लागल्याने खबरदारी म्हणून अर्ध्यावरुन शाळा सोडून दिली. सोनाळी-कुंभवडे मार्गावरील कॉजवेवर पुराचे पाणी होते. वैभववाडी तालुक्यात पडत असलेल्या संततधार पावसाने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते.
ग्रामस्थांनीच रस्त्यावरील झाड हटविले
खारेपाटण-गगनबावडा राज्य महामार्गावर सकाळी ११.३0 च्या सुमारास तिरवडे खिंडीत आकेशियाचे झाड कोसळले. त्यामुळे माग पूर्णपणे बंद होऊन तासभर वाहतूक ठप्प झाली होती. या काळात कुसूर व मांगवली, हेतमार्गे वाहतूक सुरू होती. सार्वजनिक बांधकाम किंवा आपत्कालीन कक्षातून कोणतीही हालचाल न झाल्याने अखेर तिरवडेतील ग्रामस्थांनी रस्त्यावर कोसळलेले झाड हटवून वाहतूक सुरळीत केली.
करुळ, भुईबावडा घाटात पडझड
करुळ आणि भुईबावडा घाटात छोटे दगड पडत होते. मात्र, त्याचा वाहतुकीला अडथळा झालेला नाही. दुपारनंतर पावसाचा जोर अंशत: ओसरला. पावसाचा जोर वाढल्याने नदीनाल्यांच्या पातळीत कमालीची वाढ झाली आहे. अतिवृष्टीमुळे तालुक्यात नुकसानीची उशिरापर्यंत नोंद झाली नव्हती.