कोकण रेल्वेवर प्रचंड गर्दी; चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2018 06:21 AM2018-09-21T06:21:37+5:302018-09-21T06:23:21+5:30
गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्गात दाखल झालेल्या चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे.
सिंधुदुर्ग : गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्गात दाखल झालेल्या चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. त्यामुळे रेल्वेच्या नियमित गाड्यांसह जादा गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी होत आहे. त्याचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसत आहे.
गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेमार्गावर जादा रेल्वे फेऱ्या सोडण्यात आल्या होत्या. त्यातून लाखोंच्या संख्येने चाकरमानी सिंधुदुर्गात आले होते. आता हे चाकरमानी परतीच्या प्रवासाला निघाले आहेत. त्यामुळे सर्व रेल्वे गाड्या प्रवाशांनी फुल्ल होत आहेत. दिवा पॅसेंजर, मांडवी एक्स्प्रेस, जनशताब्दी एक्स्प्रेस, तुतारी, कोकण कन्या एक्स्प्रेस व मंगलोर एक्स्प्रेस या नियमित रेल्वे गाड्या तसेच जादा गाड्याही फुल्ल होत आहेत. त्यामुळे अनेक प्रवाशांना उभ्यानेच प्रवास करावा लागत आहे.
पुढील काही दिवस गर्दीचेच!
सिंधुदुर्गातच सर्व गाड्या फुल्ल झाल्याने रत्नागिरी तसेच रायगड जिल्ह्यातील प्रवाशांना या गाड्यांमध्ये चढताच येत नाही. त्यांच्याकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.