सिंधुदुर्ग : हेळदे पूल धोकादायक, प्रवाशांसाठी जीवघेणा प्रवास : दुरुस्ती करण्याची ग्रामस्थांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2018 03:42 PM2018-07-05T15:42:39+5:302018-07-05T15:44:33+5:30
देवगड तालुक्यातील पडेल व तिर्लोट ही दोन गावे जोडणाऱ्या रस्त्यावरील हेळदे पूल ढासळत असून या ठिकाणावरून वाहनचालकांना वाहन चालविणे म्हणजे जीवघेणा प्रवास ठरत आहे. यामुळे या पुलाची तत्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी पडेल परिसरातील ग्रामस्थांनी बांधकाम विभागाकडे केली आहे.
देवगड : तालुक्यातील पडेल व तिर्लोट ही दोन गावे जोडणाऱ्या रस्त्यावरील हेळदे पूल ढासळत असून या ठिकाणावरून वाहनचालकांना वाहन चालविणे म्हणजे जीवघेणा प्रवास ठरत आहे. यामुळे या पुलाची तत्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी पडेल परिसरातील ग्रामस्थांनी बांधकाम विभागाकडे केली आहे.
गेले चार दिवस देवगड तालुक्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने अनेक ठिकाणी रस्त्याच्या बाजूचे संरक्षक कठडे खचल्याच्या घटना ताज्या असतानाच तालुक्यातील पडेल व तिर्लोट ही दोन गावे जोडणाऱ्या रस्त्यावरील हेळदे पूल ढासळले असून या पुलावरून वाहतूक करणे धोक्याचे बनले आहे.
या पुलाची उंचीही कमी असल्याने मोठा पाऊस पडल्यास पुलावरून होणारी वाहतूक खोळंबते. पुलाची उंची वाढविण्यात यावी अशीही मागणी होत आहे.
तिर्लोट गावातील विद्यार्थ्यांना पडेल हायस्कूलला जाण्यासाठी सुबैया साकव नादुरुस्त असल्याने याच पुलावरून पायी प्रवास करावा लागतो. पडेलवरून तिर्लोटला जाणाऱ्या व तिर्लोटवरून पडेलला येणाऱ्या गाड्यांची वर्दळ या पुलावरून सतत सुरू असते. यामुळे या पुलाची तत्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
ढासळलेल्या या हेळदे पुलाची पाहणी पडेल गावचे स्वाभिमानचे कार्यकर्ते भूषण बोडस, वैभव वारीक, पडेल विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे उपाध्यक्ष संतोष मासये, रवी घाडी व शिवसेनेचे संजय गांवकर, पडेलचे माजी सरपंच संजय मुळम यांनी केली. या पुलाची तत्काळ दुरुस्ती करावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे.
या पुलाच्या शेजारी हजारो हेक्टर शेतजमीन असून या पुलावरून पाणी गेल्यानंतर बाजूला असलेल्या शेतमळ्यामध्ये हे पाणी शिरुन शेतजमिनीचेही नुकसान होत आहे. तसेच या पुलाच्या बाजूला खारलँड विभागातर्फे बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यांचीही दुरवस्था झाल्याने शेतजमिनीचे नुकसान होत आहे.