पर्यटनस्थळे ‘हेलीपॅड’ने जोडणार

By admin | Published: May 21, 2015 10:50 PM2015-05-21T22:50:51+5:302015-05-22T00:14:37+5:30

जिल्ह्यात ९ प्रस्ताव तयार : बांधकाम विभाग मंजुरीसाठी केंद्राकडे पाठविणार

The helipad will connect the tourist sites | पर्यटनस्थळे ‘हेलीपॅड’ने जोडणार

पर्यटनस्थळे ‘हेलीपॅड’ने जोडणार

Next

अनंत जाधव - सावंतवाडी -सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन स्थळे हेलीपॅडने जोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे. सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्ह्यातील नऊ ठिकाणी हेलीपॅड प्रस्तावित केली असून, आणखी काही जागेच्या शोधात आहे. ही सर्व हेलीपॅड महत्त्वाच्या पर्यटन स्थळांवर करण्यात येणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा होऊन १७ वर्षे झाली. पण या जिल्ह्यात पर्यटन स्थळांच्या विकासासाठी ठोस भूमिका घेण्यात आली नाही. मात्र, नवीन युती सरकारने सिंधुदुर्गच्या पर्यटन विकासाला प्राधान्य दिले आहे. केंद्र सरकारने जिल्ह्यातील पर्यटन स्थळाच्या विकासासाठी शंभर कोटी जाहीर केले आहेत. त्यामुळे सध्या युद्धपातळीवर पर्यटन स्थळे शोधण्यात येत असून त्याचा विकास करण्यात येणार आहे. पालकमंत्री दीपक केसरकर स्वत: पर्यटन स्थळांच्या विकासासाठी आग्रही असून सर्व अधिकाऱ्यांना सोबत घेऊन ते स्वत: महत्त्वाच्या पर्यटन स्थळांची पाहणी करीत आहेत.
या नऊ जागांचे प्रस्ताव बांधकाम विभागाने तयार केले असून हे प्रस्ताव राज्यसरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे पाठविण्यात येणार आहेत. केंंद्र सरकारने या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर प्रत्यक्षात या कामाला सुरुवात होणार आहे.
बांधकाम विभाग या नऊ जागांव्यतिरिक्त आणखी काही जागा घेण्यास तयार असून सर्व पर्यटन स्थळे हेलीपॅडने जोडली तर एखाद्या उद्योजकाला किंवा पर्यटकाला सिंधुदुर्गमध्ये हॅलीकॉप्टरने आल्यास अनेक फायदे होणार आहेत. तो पर्यटक एखादे पर्यटन स्थळ पाहून किंवा आपले काम करून तातडीने पुन्हा जाऊ शकतो, हाच यामागचा उद्देश आहे.
शासनाची ही योजना खूप चांगली व पर्यटन वाढीस चालना देणारी आहे. यामुळे जिल्ह्यातील सर्व ठिकाणे जोडली जाणार आहेत. मात्र, त्यासाठी शासनकर्त्यांनी पाठपुरावा करणे आवश्यक आहे. यासाठी लागणारा मंजुरी आणि निधी आणि आवश्यक जागादेखील उपलब्ध करून देणे गरजेचे जेणेकरून हे काम लवकरात लवकर होईल.


अद्याप एकही प्रस्ताव आला नाही
आम्ही हेलीपॅडचे प्रस्ताव तयार करण्याचे काम सध्या करीत असून सद्यस्थितीत नऊ प्रस्ताव तयार झाले आहेत. खासगी व्यक्तींनी पुढे येऊन आपली जागा दिल्यास त्यात हेलीपॅड तयार करण्यात येणार असून अद्यापपर्यंत एकही तसा प्रस्ताव आला नाही. मात्र, प्रस्ताव आल्यास तो त्वरित तयार करून केंद्रशासनाकडे पाठविण्यात येणार आहे. जेणेकरून लवकरात लवकर यासाठी निधी मंजूर होऊन काम सुरू करणे सोपे जाणार आहे.
- प्रकाश शिंदे, बांधकाम अभियंता


एक एकर जागा संपादीत करणार
सिंधुदुर्ग जिल्ह्यात नऊ ठिकाणी हेलीपॅड सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रस्तावित केली आहेत. यात शिरोडा, आंबोली, सावंतवाडी, मिठबाव, विजयदुर्ग, मालवण, वेंगुर्ले, तिलारी आदी ठिकाणांचा समावेश असून प्रत्येक हेलीपॅडसाठी एक एकर जागा संपादित करण्यात येणार आहे. तयार होणारी हेलीपॅड शासनाच्याच जागेत करण्यात येणार आहेत.

महत्त्वपूर्ण निर्णय
सिंधुदुर्गमधील पर्यटनस्थळांचा विकास होत असताना तेथे मोठ्या प्रमाणात देशी, विदेशी पर्यटक आले पाहिजेत. यासाठीही पर्यटन स्थळे हेलीपॅडने जोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे.



पर्यटन स्थळी जाणे सोयीचे
पर्यटकांना जिल्ह्यातील कुठल्याही स्थळावर त्वरीत जाण्यास या हेलीपॅडचा वापर होईल. त्यामुळे ते सोयीचे होणार आहे.

Web Title: The helipad will connect the tourist sites

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.