आरोपीला मदत; पोलिसावरच गुन्हा दाखल
By admin | Published: April 2, 2017 11:27 PM2017-04-02T23:27:26+5:302017-04-02T23:27:26+5:30
आरोपीला मदत; पोलिसावरच गुन्हा दाखल
रत्नागिरी : खासदार व आमदारांच्या नावाने फसवणूक करणाऱ्या संतोष दगडू नारायणकर (वय ५४, बीड) या संशयिताला पैसे घेऊन मदत करणाऱ्या पोलिस हेड कॉन्स्टेबलविरोधात शहर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीनिवास गजानन नाटेकर असे या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव असून, त्याच्यावर या अगोदरच निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. लवकरच नाटेकर याला ताब्यात घेण्यात येणार आहे.
संतोष नारायणकर याने अनेक खासदार व आमदारांची नावे घेत शासकीय कामाच्या निविदा भरून शासनाची फसवणूक केली होती. त्यामध्ये खेड तालुक्यातील एका निविदेचाही समावेश होता. त्याने आमदार, खासदारांच्या नावाने फसवणूक केल्याचे निदर्शनास आल्यानंतर शहर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीला अटक करण्यासाठी २७ नोव्हेंबर २०१६ रोजी पोलिस हेड कॉन्स्टेबल श्रीनिवास नाटेकर व पोलिस कॉन्स्टेबल गणेश शिंदे यांना राजस्थान येथे पाठविण्यात आले होते. त्यावेळी या दोघांनी संतोष नारायणकर याला पकडले; परंतु त्याला अटक न करता त्याच्याकडून हजारो रुपये घेऊन ते रत्नागिरीत परत आले व शहर पोलिस स्थानकात तो सापडला नसल्याचा खोटा रिपोर्ट सादर केला.
या गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक नितीन ढेरे यांच्याकडे देण्यात आला; परंतु हे पथक राजस्थानला निघण्यापूर्वीच श्रीनिवास नाटेकर याने संतोष नारायणकर याला दूरध्वनीवरून ‘तुझ्या शोधासाठी एक पथक राजस्थानला येत असून तू पळून जा’, अशी माहिती या आरोपीला दिली. त्याचबरोबर आपला बँक खाते क्रमांक देऊन त्यावर पैसे टाकण्याची मागणी केली; परंतु संतोष नारायणकर याच्या अटकेनंतर नाटेकर याचे बिंग सर्वांसमोर फुटले.
जिल्हा पोलिस दलाचा विश्वासघात करणाऱ्या श्रीनिवास नाटेकर याला अटक करण्यासाठीचा अर्ज पोलिस मुख्यालयात पाठविण्यात आला. त्यावर चर्चा झाल्यानंतर पोलिस अधीक्षक प्रणय अशोक, अतिरिक्त पोलिस अधीक्षक मितेश घट्टे व उपविभागीय अधिकारी जयश्री गायकवाड या वरिष्ठांच्या संमतीने सहायक पोलिस निरीक्षक नितीन ढेरे यांनी फिर्याद दिली. त्यानुसार श्रीनिवास नाटेकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस निरीक्षक विनित चौधरी करीत आहेत. (वार्ताहर)