पायाभूत सुविधांसाठी मदत करा

By admin | Published: April 5, 2016 10:15 PM2016-04-05T22:15:24+5:302016-04-06T00:26:19+5:30

कोकण विकासावर चर्चा : आमदार भास्कर जाधव यांची विधानसभेत मागणी

Help with infrastructure | पायाभूत सुविधांसाठी मदत करा

पायाभूत सुविधांसाठी मदत करा

Next

रत्नागिरी : मुंंबई कोकण वैधानिक विकास मंडळ स्थापन करून पर्यटन, फलोत्पादन आणि मत्स्य व्यवसाय क्षेत्रांच्या विकासासाठी भरीव मदत करा, ही मदत पॅकेजरूपी नको, तर गुंतवणूक म्हणून करावी, अशी आग्रही मागणी आमदार भास्कर जाधव यांनी आज विधानसभेत केली.
कोकण विकासाच्या प्रस्तावावर चर्चेचा प्रारंभ करताना ते बोलत होते. आमदार जाधव यांच्या भाषणादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सभागृहात उपस्थित होते. विधानसभा अस्तित्त्वात आल्यापासून पहिल्यांदाच कोकणच्या विकासावर चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे ही चर्चा महत्वाची मानली जात आहे.
कोकणच्या विकासावर चर्चा होण्यासाठी आमदार जाधव यांनी चालू असलेल्या विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रयत्न केले. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश आले. ३१ मार्च रोजी त्यांनी प्रस्ताव मांडला होता, आज तो चर्चेला आला. या चर्चेची सुरुवातही जाधव यांनी केली. आपल्या ५० मिनिटांच्या भाषणात त्यांनी कोकणच्या विकासासाठी काय करायला हवं, याबाबतच्या मागण्या शासनापुढे ठेवल्या. अतिवृष्टी झाली, वादळ-वारा झाला, पाऊस कमी पडला, पिके धोक्यात आली, नुकसान झालं, तर आक्रस्ताळेपणा करून कोकणी माणूस कधी मदतीसाठी हात पसरत नाही, कर्जमाफी करा, असं म्हणत नाही. त्यामुळे सरकार कोकणला अशी मदत करू शकत नसेल तर कोकणच्या विकासाकरिता, पायाभूत सुविधांकरिता मदत करावी, अशी मागणी त्यांनी सुरुवातीलाच केली.
पर्यटनस्थळांचा विकास, फळांवरील प्रक्रिया आणि मत्स्य व्यवसाय हे डॉलर म्हणजे परकीय चलन मिळवून देऊ शकतात. पण, डॉलर भूमी असलेले कोकण आजपर्यंत दुर्लक्षितच राहिले आहे. शासनाने गुंतवणूक किंवा कर्ज म्हणून या क्षेत्राच्या विकासासाठी दहा वर्षे मदत करावी. त्यामुळे भविष्यात कोकण राज्याच्या अर्थव्यवस्थेचा भार उचलू शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कोकण पर्यटन विकास मंडळ स्थापन करावे, मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्ग, सागरी महामार्ग पूर्णत्वास न्यावेत, सागरी जलवाहतूक सुरू करावी, कोकणातील केमिकल झोन, औष्णिक उर्जा प्रकल्प रद्द करण्यात आल्याची घोषणा करावी, पर्यटन विकासासाठी विमानतळांचा विकास करावा, कोकणसाठी स्वतंत्र विद्यापीठ, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मत्स्यविद्यापीठ, मेरिटाईम ट्रेनिंग इन्स्टिट्यूट उभारावेत, प्रदूषणकारी कारखान्यांऐवजी कोकणात इंजिनियरिंग, फळप्रक्रिया कारखाने, टेक्स्टाईल पार्क, लॉजिस्टिक बेस उद्योग आणावेत, अशी आग्रही मागणी आमदार जाधव यांनी केली.
जाधव यांनी मच्छीमारांच्या घरांखालील जागा त्यांच्या मालकीची करण्याबाबत तत्काळ निर्णय घ्यावा, अशीही मागणी केली.
बंदरांचा विकास, रखडलेले पाटबंधारे प्रकल्प यावरही त्यांनी भाष्य केले. कोकणात समुद्रबळींची संख्या कमालीची वाढली असून, ही बाब अत्यंत चिंंत्तादायक व पर्यटन विकासाला मारक असल्याचे निदर्शनास आणून दिले. गोव्याच्या धर्तीवर उपाययोजना करण्याची विनंती त्यांनी केली.
आपल्या भाषणाच्या सुरुवातीला आमदार जाधव यांनी कोकणच्या मातीतून घडलेल्या नररत्नांचा उल्लेख करून वैभवशाली परंपरा लाभलेलं कोकण उर्वरित महाराष्ट्राच्या नावाखाली मागास राहिल्याचे सांगितले. मुंबई, ठाणे, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र अशा प्रगत भागाला कोकण जोडण्यात आल्याने कोकणचा अनुशेष दिसून येत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
आता कोकणच्या सर्वांगिण विकासाचा आराखडाच तयार करावा, अशी आग्रही मागणीही त्यांनी केली. कोकणच्या प्रस्तावावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वत: उत्तर देणार असून, आमदार जाधव यांनी मांडलेल्या प्रश्नांवर ते कोणता न्याय देतात, याकडे कोकणवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.(प्रतिनिधी)

पर्ससीन : बंदीकाळात नव्याने निर्णय घ्या
कोकणातील पर्ससीनेट मच्छीमारांवर घालण्यात आलेल्या बंदीवर तात्पुरती स्थगिती देऊन पावसाळ्यात मासेमारी बंदीच्या काळात नव्याने निर्णय घ्यावा, अशी आग्रही मागणी जाधव यांनी यावेळी केली...


आमदार अनुपस्थित
कोकणच्या विकासावर चर्चा सुरू झाली असताना कोकणातील शिवसेनेचे काही आमदार मात्र अनुपस्थित होते.

Web Title: Help with infrastructure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.