मालदोलीतील ‘त्या’ हेरिटेज वास्तूला पर्यटनात स्थान हवे!
By admin | Published: September 15, 2016 01:03 AM2016-09-15T01:03:19+5:302016-09-15T01:06:43+5:30
चिपळूण तालुका : अभियांत्रिकी नवल ठरलेली रामचंद्र वासुदेव मराठे न्यास वास्तू नव्वद वर्षानंतरही जशीच्या तशी--अभियंता दिन विशेष
चिपळूण : मालदोली गावात साधारण नव्वदहून अधिक वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या त्या अभियांत्रिकी नवल ठरलेल्या रामचंद्र वासुदेव मराठे न्यास या हेरिटेज वास्तूला कोकण पर्यटन नकाशात स्थान मिळायला हवे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. खाडीकिनारी वसलेल्या मालदोली गावातील या वास्तूची आजची काठीण्यपातळी पाहता तिचे संपूर्ण नियोजन करणारी व्यक्ती त्या काळातील अभियांत्रिकी क्षेत्रातील तज्ज्ञ जाणकार असावी, या मताशी कोणीही सहमत होईल.
साडेसात एकर जागेतील सुमारे २ हजार चौरसफूट आकाराच्या या वास्तूच्या अंतर्गत रचनेविषयी श्रीकांत बापट यांनी माहिती दिली. यावेळी शिक्षक विलास महाडिक उपस्थित होते. मुख्य दरवाजापासून पाठीमागच्या दरवाजापर्यंत सरळरेषेत मोकळी जागा असून, (कॉरिडॉर) त्याच्या दोन्ही बाजूला वास्तूतील खोल्यांचे नियोजन करण्यात आले आहे. पहिल्या मजल्यावर मोठा हॉल आहे. वास्तूच्या आतून आणि बाहेरून पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी लाकडाचे स्वतंत्र दोन जिने आहेत. जिने चढताना कोणाही ज्येष्ठ नागरिकाला आधाराची गरज भासणार नाही वा तो चढताना दमणार नाही, अशी तंत्रशुद्ध रचना करण्यात आली आहे. वास्तूतील काही खोल्या गरजेप्रमाणे एकमेकांना जोडल्या आहेत. जेवणासाठी लागणारे मसाल्याचे मिश्रण बनवण्यासाठी, मिक्सर नसलेल्या काळातील घडीव ‘पाटा’ येथे आहे. पाण्यासाठी विहीर तसेच पाठीमागील बाजूकडील डोंगरात असलेल्या झऱ्यांचे पाणी, विशिष्ठ उंचीवर १० बाय २० फूट आकाराचे मोठाले टाके बांधून पाणी साठवण्यात आले आहे. तब्बल नव्वद वर्षांनंतरही या वास्तूतील लाकडाला काही झालेले नाही. त्या काळात या लाकडाला प्रतिबंधक व्यवस्था केलेली असणार हे नक्की आहे.
वास्तूतील जवळपास वीस -बावीस खोल्यांना प्रत्येकी दोन दरवाजे, दोन खिडक्या, भिंंतीतील दोन कपाटे आहेत, खिडक्यांना चार झडपा आहेत. यामुळे शास्त्रीयदृष्ट्या दिवसा आवश्यक असणारा चौफेर सूर्यप्रकाश वास्तूतील प्रत्येक खोलीत उपलब्ध होतो. सायंकाळी किमान सात वाजेपर्यंत वास्तूला विजेची आवश्यकता भासत नाही. प्रत्येक दरवाजाला व्हेंटीलेटरची रचना आहे. कौलारू बांधणीच्या या वास्तूतील आतील छताच्या रिपांचा भाग वास्तूसौंदर्याचा विचार करून फळ्या मारून बंद करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
विश्व हिंदू परिषदेला दान
मधुकाका बर्वे यांच्यामुळे विविध सेवाभावी प्रकल्पांसाठी ही वास्तू विश्व हिंंदू परिषद महाराष्ट्र प्रदेशास दान मिळाली. वास्तू नोंदणीकृत रामचंद्र वासुदेव मराठे न्यास १० मे १९८५ रोजी करण्यात आली. दानपत्र यशवंत परशुराम मराठे यांनी केले होते. शिक्षण, वैद्यकीय साहाय्य, दारिद्र्य निवारण, नैसर्गिक आपत्ती परिहार, उपेक्षितांचा उत्कर्ष, ग्रामविकास, संस्कृत भाषा शिक्षण हे या न्यासाचे मुख्य उद्देश आहेत. न्यासाचे अध्यक्ष म्हणून प्रकाश साठे, सचिव श्रीकांत ऊर्फ भाऊ बापट, विश्वस्त अनिरुद्ध भावे, श्रीनिवास केतकर, दत्ताराम केतकर, राजाभाऊ जोशी, पिनाकिन मराठे (मूळ मालकांचे वंशज) काम पाहतात.
सुमारे २० वर्षांपूर्वी आरोग्य प्रकल्प राबवला
सुरूवातीची सुमारे २० वर्षे बिरवाडी-महाड येथील डॉ. गोखले यांनी येथे आरोग्य प्रकल्प राबवला होता. छोट्या-मोठ्या वैद्यकीय शस्त्रक्रिया त्या काळात येथे होत. वास्तूत आजही आॅपरेशन थिएटर नावाचा फलक आपल्याला दिसतो. तद्नंतर सुमारे १५ वर्षे हा भाग दुर्लक्षित राहिला. सध्या येथे फिरते मोफत वाचनालय आणि मोफत संगणक प्रशिक्षण वर्ग चालतो. वाचनालयात राष्ट्रपुरुषांची ५०० पुस्तके आहेत.