हेवाळे, बांबर्डेत हत्तींचा मुक्तसंचार; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 02:54 PM2020-04-11T14:54:48+5:302020-04-11T14:55:03+5:30
वन्य हत्तींच्या भर दिवसा थेट रस्त्यावरील दर्शनाने नागरिकांत कमालीची घबराट पसरली आहे. या कळपात दोन पिल्लू व एक मादी हत्तींचा समावेश आहे.
दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यात हेवाळे, बांबर्डे गावात मुख्य राज्यमार्गावर दिवसाढवळ्या वन्य हत्ती मुक्तपणे फिरू लागल्याने हेवाळे पंचक्रोशीतील नागरिकांत भीती पसरली आहे. यापूर्वी रानटी हत्तींचे अनेक हल्ले पचविलेल्या हेवाळे व पंचक्रोशीतील नागरिकांना आता तर जीवावर उदार होऊन घराबाहेर पडावे लागणार आहे. वन्य हत्तींच्या भर दिवसा थेट रस्त्यावरील दर्शनाने नागरिकांत कमालीची घबराट पसरली आहे. या कळपात दोन पिल्लू व एक मादी हत्तींचा समावेश आहे.
रात्री नुकसानी आणि दिवसा भरवस्तीत व रस्त्यावर या हत्तींचा मुक्तसंचार सुरू आहे. गेली कित्येक वर्षे हेवाळे, बांबर्डे व घाटीवडे येथे वन्य हत्तीचे वास्तव्य असून नुकसान सत्र अद्यापही कायम आहे. गेल्या दोन दिवसांपासून तर हा वन्य हत्तींचा कळप हेवाळे, बांबर्डे घाटीवडे येथे असलेल्या अननस बागेत धुमाकूळ घालत होता. वनखात्याने वन्यहत्तींना लोकवस्ती व शेतातून नैसर्गिक अधिवासात पुन्हा पाठवण्यासाठी ५ जणांचे दैनंदिन गस्तीपथकसुद्धा हेवाळे, घाटीवडे, बांबर्डे व बाबरवाडी गावासाठी तैनात केले आहे.
मात्र सायंकाळी ७ची ड्युटी असूनही हे पथक रात्री १0 पर्यंत गावात फिरकत नाही. शिवाय ५ जणांची कागदोपत्री टीम आणि ड्युटीवर अवघे २-३ जण अशी अतिशय बेजबाबदार आणि शासकीय कर्मचा-यांच्या कर्तव्याला हरताळ फासणारी ड्युटी संबंधित कर्मचारी बजावत आहेत. तर एकदा गावात बांबर्डे येथे दाखल झाले की रात्री अन्य ठिकाणी गस्त घालण्याचीसुद्धा तसदी बिलकुल हे पथक घेत नाही. त्यामुळे वनखात्याचा बिनबोभाट कारभार तिलारी खो-यात सुरू आहे.
जनआंदोलन छेडण्याचा इशारा
पिलांमुळे मादी आक्रमक झाली असून, हत्तींचा रात्रंदिवस संचार असताना वनखाते सुशेगात आहे. कोरोनामुळे नागरिक व शेतकरीसुद्धा सध्या घरातच अडकले असून, शेती बागायतीचे अतोनात नुकसान सुरू आहे. त्यामुळे जिल्हा उपवनसंरक्षक यांनी या परिस्थितीत तत्काळ सुधारणा करावी. अन्यथा मुख्य वनसंरक्षक यांचे लक्ष वेधून कोरोना आपत्ती संपताच मोठे जनआंदोलन उभारले जाईल, असा सक्त इशारा माजी सरपंच संदीप देसाई यांनी दिला आहे.