अतिदक्षतेचे आदेश, बंदोबस्त कडक
By admin | Published: January 25, 2016 11:43 PM2016-01-25T23:43:15+5:302016-01-25T23:43:15+5:30
रत्नागिरी जिल्हा : ‘इसिस’च्या पार्श्वभूमीवर खबरदारी
रत्नागिरी : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर ‘इसिस’च्या संभाव्य कारवायांवर नजर ठेवणे व अशा देशविघातक कारवाया रोखण्यासाठी जिल्ह्यात सर्वत्र कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जिल्ह्यातील महत्वाच्या सर्व चेकनाक्यांवरील बंदोबस्त अधिक कडक करण्यात आला आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने वरिष्ठ पातळीवरुन पोलिसांना अतिदक्षतेचा इशारावजा आदेश देण्यात आला आहे.
रत्नागिरी तालुक्यातील भाट्ये, मिरकरवाडा बंदर तसेच जयगड या सागरी हद्दीत असलेल्या चेकनाक्यांवर पोलिसांना दक्षतेचे आदेश देण्यात आले आहेत. सागरी क्षेत्रातील नाटे, तसेच जिल्ह्यातील सर्वच सागरी पोलीस ठाण्यांच्या क्षेत्रातील पोलिसांना सागरी क्षेत्रावर करडी नजर ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
२०१५ या वर्षात जिल्हा पोलिसांकडून सागरी कवच अभियान राबविण्यात आले होते. त्यातील अनुभवाचा उपयोग पोलीस कर्मचाऱ्यांना या बंदोबस्ताच्या निमित्ताने होणार आहे.
राज्यातील अनेक भागांमध्ये गेल्या पंधरा दिवसात ‘इसिस’शी संबंधित अनेक संशयित आरोपींची गुप्तचर यंत्रणांनी धरपकड केली आहे. यावेळच्या प्रजासत्ताक दिनाला काही घातपाताच्या घटना घडू नयेत, यासाठी पोलीस दलातर्फे सतर्कता बाळगली जात आहे. जिल्ह्यातील खेड तालुक्यामधील एक तरुण मुंबई येथून बेपत्ता झाला असून, त्याबाबत एटीएस यंत्रणा कसून तपास करत आहे. ‘इसिस’चे नेटवर्क मोडून काढण्यात गुप्तचरांना यश आले असले तरी धोका टळलेला नाही. त्यामुळेच प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सर्वत्र नाकेबंदी करण्यात आली आहे. वाहनांची तपासणीही करण्यात येत आहे. अज्ञात व काळ्या काचा असलेल्या वाहनांवर करडी नजर ठेवण्यात येत आहे.
महामार्गावरील भरणे, चिपळूण, हातखंबा व अन्य नाक्यांवर वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. ‘इसिस’शी संबंधित संशयास्पद हालचालींची संभाव्यता लक्षात घेऊन अशा ठिकाणांवरही खास नजर ठेवण्यात येत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील बंदोबस्ताची व्यवस्था अधिक भक्कम करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
सुरक्षितता : चेकनाक्यांवर बंदोबस्त वाढवला
राज्यभर ‘इसिस’शी संबंधित संशयितांची धरपकड सुरु आहे. या संघटनेने दिलेल्या इशाऱ्यामुळे सर्व जिल्ह््यांमध्ये अतिदक्षतेचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह््यातील सर्व चेकनाक्यांवर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.