corona virus-कणकवलीतील उपजिल्हा रूग्णालयात अतिदक्षता विभाग सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2020 03:12 PM2020-03-12T15:12:54+5:302020-03-12T15:15:18+5:30
कणकवली उपजिल्हा रूग्णालयात कोरोना व्हायरसबाबत खबरदारी म्हणून २० खाटा, व्हेंटीलेटर व अन्य सुविधा असलेला अतिदक्षता विभाग सज्ज करण्यात आला आहे. परंतु , कोरोना व्हायरसबाबत नागरीकांनी दक्षता जरूर घ्यावी, असे आवाहन कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे व कणकवली उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. सहदेव पाटील यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत केले .
कणकवली : कणकवली उपजिल्हा रूग्णालयात कोरोना व्हायरसबाबत खबरदारी म्हणून २० खाटा, व्हेंटीलेटर व अन्य सुविधा असलेला अतिदक्षता विभाग सज्ज करण्यात आला आहे. परंतु , कोरोना व्हायरसबाबत नागरीकांनी दक्षता जरूर घ्यावी, कोरोना व्हायरसमुळे मोठ्या प्रमाणात सोशल मिडीयाच्या माध्यमातून गैरसमज निर्माण करण्याचे काम काही जणांकडून होत आहे. मात्र, या व्हायरसबाबत सध्यातरी सिंधुदुर्गवासीयांनी धसका घेण्याची गरज नाही. असे आवाहन कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे व कणकवली उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. सहदेव पाटील यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत केले .
कणकवली नगरपंचायत कार्यालयात गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत समीर नलावडे व डॉ. सहदेव पाटील यांनी कोरोना व्हायरसबाबत आढावा घेतानाच कणकवलीत राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.
यावेळी समीर नलावडे म्हणाले, सोशल मिडीयावरील गैरसमजाला बळी पडू नका. कोरोना व्हायरसबाबत आम्ही जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसिलदार व उपजिल्हा रूग्णालय यांच्याशी संवाद साधत असून योग्य ती काळजी घेत आहोत. यामुळे या व्हायरसची भिती बाळगण्याचे कारण नाही.
डॉ. सहदेव पाटील म्हणाले, सर्दी, खोकला, घशातील खवखव , ताप ही कोरोना व्हायरसची प्राथमिक लक्षणे आहेत. श्वास कोंडणे, धाप लागणे आणि त्यानंतर न्युमोनिया होणे अशा प्रकारची लक्षणे कोराना व्हायरसमध्ये असून अशा रूग्णांनी गर्दीपासून लांब राहणे गरजेचे आहे.
कोरोना व्हायरसला प्रतिबंध करण्यासाठी केएन-९५ व केएन- ९०, पीएम २.४, पीएम ५ यासारखे मास्क उपलब्ध आहेत. मात्र हे मास्क सर्वांनीच लावणे गरजेचे नाही. ज्यांचा कोरोना व्हायरसग्रस्त रूग्णांशी थेट संबंध येतो, अशा डॉक्टर, कर्मचारी, नातेवाईक त्याचप्रमाणे त्या रूग्णांची चौकशी करणाऱ्यांनी लावणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्वांनीच मास्क वापरावे, हा केवळ गैरसमज असल्याचे सांगताना डॉ. पाटील म्हणाले, कोरोना व्हायरस टाळायचा असले तर ती व्यक्ती कोरोनाग्रस्त रूग्णापासून सहा फुटापेक्षा जास्त अंतर लांब असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे १० मिनिटापेक्षा जास्त वेळ अशा व्यक्तीच्या संपर्कात राहिल्यास कोरोना होवू शकतो. मात्र चीनमध्ये ज्या प्रमाणात कोरोना फैलावत आहे. त्याला तेथील लोकांचे खाणे जबाबदार आहे.
वटवाघळाच्या माध्यमातून हा व्हायरस फैलावल्याचे सांगण्यात येते. मात्र भारतील वटवाघळांमध्ये याबाबतची लक्षणे आढळलेली नाहीत तरी कोरोनाचा फैलाव रोखायचा असेल तर विमानतळावर आवश्यक त्या उपाययोजना करणे आवश्यक असून त्या उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर रूग्णांची पीसीआर तपासणी केली जात असून सिंधुदुर्गात अद्यापपर्यंतरी कोरोना लक्षणे असलेला रूग्ण आढळलेला नाही, असे डॉ. पाटील म्हणाले.
चिकन, मटन, मच्छि या माध्यमातून कोरोना झाल्याचे ऐकिवात नाही़. आपल्याकडे चिकन, मटन हे चांगल्याप्रकारे शिजवून खाले जाते. त्यामुळे यातून लागन होण्याची शक्यता जवळपास नाहीच. त्यामुळे हाही गैरसमज नागरीकांनी दूर करावा, असे आवाहन डॉ. पाटील यांनी केले.