महामार्ग बनला मृत्यूचा सापळा
By admin | Published: June 17, 2014 01:10 AM2014-06-17T01:10:43+5:302014-06-17T01:15:22+5:30
झाराप पत्रादेवी बायपास : सहा महिन्यात पंधरा जणांनी गमावला जीव
रामचंद्र कुडाळकर ल्ल तळवडे
सावंतवाडी तालुक्यातील मळगाव गावातून गेलेला झाराप- पत्रादेवी महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. दर महिन्याला दोन ते तीन जणांचा मृत्यू या भागात होत असून गेल्या तीन-चार महिन्यात तर येथील अपघातांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या कालावधीत या भागात पंधरा जणांना जीव गमवावा लागला आहे. याबरोबरच शेतकऱ्यांची जनावरेही बळी पडल्याने हा रस्ता म्हणजे शाप की वरदान, असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.
झाराप-पत्रादेवी महामार्गाचे काम सुरू झाल्यानंतर नेमळे, मळगाव, वेत्ये गावातील ग्रामस्थांमध्ये उत्साह होता. महामार्गामुळे या भागाचा कायापालट होईल, अशी सर्वांचीच अपेक्षा होती आणि तसे झालेही. महामार्गानंतर येथील जमिनींचे दर वाढले. काही विकास कामे झाली. लहान- मोठ्या व्यावसायिकांना रोजगार मिळाला. परंतु कालांतराने या महामार्गावरील वाहतूक वाढताना अपघातांचे प्रमाणही वाढले. महिन्याच्या अंतराने होणाऱ्या अपघातांमुळे बऱ्याच जणांना जीव गमवावा लागला आणि या रस्त्याची भीषणता समोर आली.
मळगाव गावातून गेलेला हा चार पदरी महामार्ग धोकादायक बनत चालला आहे. हा महामार्ग उंच-सखल आहे. संबंधित कंपनीकडून चांगल्या दर्जाचे काम झालेले नाही. मळगाव ब्रिजकडे खचलेल्या रस्त्यावरून हे सहज लक्षात येते. यासह या पूर्ण मार्गावर रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचा मळगाव ग्रामस्थांचा आरोप आहे. गोवा व मुंबईच्या दिशेने जाणारे वाहन चालक या महामार्गावर अतिवेगात गाड्या चालवितात. परंतु या महामार्गावर कुठे बायपास आहे, कुठे ओव्हरब्रिज आहे याची त्यांना कल्पना नसते. या मार्गाला जोडलेले बायपास रस्ते उंचावरुन खाली येणारे किंवा सखल भागातून महामार्गाला मिळत असल्याने महामार्गावरुन अति वेगात येणाऱ्या गाड्यांना याचा अंदाज येत नाही.
त्यामुळे रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीस्वार, रिक्षाचालक किंवा पादचारी यांचे अपघातात मृत्यू होत आहेत. नेमळे-मळगाव-व्येत्ये या आठ किलोमीटरच्या भागात आतापर्यंत वीस जणांचे मृत्यू झाले आहेत. याला जबाबदार कोण? गेल्या पाच-सहा महिन्यात वीस जणांची कुटुंबे उद्ध्वस्त झाली. तर पुढे पावसाळ्याच्या हंगामात काय? अशी भीती ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.
अपघातातील कारणांचा विचार करता, या महामार्गावर कुठेही वेग मर्यादेचे ठळक बोर्ड नाहीत. त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्हा आरटीओ प्रशासन अतिवेगात गाडी चालविणाऱ्यांवर कारवाई करताना दिसत नाही. या महामार्गावरील झाराप तिठ्यावर कधीतरी पोलीस पथक तैनात असते. परंतु हे पोलीस कर्मचारी केवळ दुचाकीस्वारांची कागदपत्रे तपासून कारवाई करण्यात धन्यता मानतात. अतिवेगात गाडी चालविणाऱ्यांवर मात्र दुर्लक्ष केला जातो. या महामार्गावरील बायपासच्या ठिकाणी वेगमर्यादा फलक लावणे गरजेचे आहे. सावंतवाडी इन्सुली आरटीओ चेक नाका ते झाराप तिठा या ठिकाणच्या मार्गावर गाड्या सुसाट वेगात चालविल्या जातात. समोरच्या महामार्गाची कल्पना नसूनही पर्यटक लवकर पाहोचण्यासाठी सुसाट गाड्या सोडतात. त्यामुळे अपघात होत आहेत. तसेच अतिवेगातील वाहनांवर कारवाई होणे आवश्यक आहे. अन्यथा अपघातांचे प्रमाण वाढतच राहील, यात शंका नाही. हे सर्व अपघात नेमळे-मळगाव-वेत्ये या भागातच झाले आहेत. याशिवाय स्त्यापलिकडे असलेल्या शेतीकडे जाणाऱ्या बऱ्याच गुरांचाही मृत्यू झाल्याने शेतकरी वर्गही चिंताग्रस्त आहे. तसेच या भागातून जाणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांच्याही सुरक्षिततेचा मोठा प्रश्न उपस्थित झाला असल्याने शासन याबाबत कोणती उपाययोजना करते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.