कुडाळमधील महामार्ग चौपदरीकरण वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2020 05:03 PM2020-11-05T17:03:10+5:302020-11-05T17:06:35+5:30
vinaykraut, kudal, highway, sindhudurg कुडाळ येथील महामार्गाच्या चौपदरीकरणावेळी कुडाळ नागरिकांच्या मागण्या विचारात घेऊनच येथील महामार्गाचे काम करण्यात येईल, असे आश्वासन खासदार विनायक राऊत यांनी कुडाळवासीयांना दिले. तसेच यावेळी उपस्थित महामार्गाच्या अधिकाऱ्यांना योग्य पद्धतीने महामार्गाचे काम करा. चुकीच्या पद्धतीने नकाशे व काम खपवून घेणार नसल्याचे सांगितले.
कुडाळ : कुडाळ येथील महामार्गाच्या चौपदरीकरणावेळी कुडाळ नागरिकांच्या मागण्या विचारात घेऊनच येथील महामार्गाचे काम करण्यात येईल, असे आश्वासन खासदार विनायक राऊत यांनी कुडाळवासीयांना दिले. तसेच यावेळी उपस्थित महामार्गाच्या अधिकाऱ्यांना योग्य पद्धतीने महामार्गाचे काम करा. चुकीच्या पद्धतीने नकाशे व काम खपवून घेणार नसल्याचे सांगितले.
कुडाळ शहरातून जाणाऱ्या महामार्गावर चौपदरीकरणाच्या कामामुळे मोठ्या प्रमाणात राज हॉटेल व आरएसएन हॉटेल येथे अनेक प्रश्न व समस्या निर्माण झाल्या आहेत. याबाबत येथील नागरिकांनी तसेच कुडाळातील लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाज उठविण्यास सुरुवात केली.
दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असलेले खासदार राऊत यांनी या दोन्ही ठिकाणांची पाहणी बुधवारी सायंकाळी केली.
यावेळी जिल्हाप्रमुख संजय पडते, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा परिषद गटनेते नागेंद्र परब, जिल्हा परिषद सदस्य अमरसेन सावंत, राष्ट्रवादीचे काका कुडाळकर, सुनील भोगटे, तालुकाप्रमुख राजन नाईक, संजय भोगटे, संतोष शिरसाट, विकास कुडाळकर, अतुल बंगे, रुपेश पावस्कर, मंदार शिरसाट, नगरसेवक सचिन काळप, राजू गवंडे, तसेच शिवसेनेचे इतर पदाधिकारी, प्रांताधिकारी वंदना खरमाळे, बांधकाम विभागाच्या अनामिका जाधव, ठेकेदार कंपनीचे अधिकारी तसेच भूधारक, विविध पक्षांचे लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी येथील भूधारकांनी राज हॉटेलकडे करण्यात येणाऱ्या बॉक्सवेलचे काम हे चुकीच्या पद्धतीने होत आहे. त्यामुळे येथील नागरिकांना त्यांच्या घरी व दुकानांकडे जाण्यासाठी रस्ताच ठेवला नसल्याची तक्रार केली. या जागेची पाहणी करून खासदार राऊत यांनी येथील नागरिकांना त्यांच्या मागणीप्रमाणे रस्ता करून द्यावा. त्यासाठी योग्य तो नकाशा बनवा, असे आदेश अधिकारी व ठेकेदार यांना दिले.
अपमान सहन करणार नाही : कुडाळकर
यावेळी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कुडाळ तालुक्यातील ९० टक्के काम पूर्ण झाले. मात्र, येथील काम कुडाळवासीय बंद पाडतात, असे सांगताच काका कुडाळकर संतप्त झाले. कुडाळ वासीयांनी कधीच काम बंद पाडले नाही, सहकार्य केले. उगाच जनतेचा अपमान करू नका. अपमान सहन करणार नाही, असे कुडाळकर यांनी सांगितले.