महामार्ग मोडणार गणेशभक्तांचे कंबरडे!
By admin | Published: August 9, 2016 11:23 PM2016-08-09T23:23:53+5:302016-08-09T23:54:21+5:30
पनवेल-सावंतवाडी : खड्ड्यात बुडालेल्या रस्त्यांमुळे वाहनांचा वेग मंदावणार
प्रकाश वराडकर - रत्नागिरी -मुंबई - गोवा महामार्ग पनवेलपासून सावंतवाडीपर्यंत अनेक ठिकाणी खड्ड्यात गेल्याची भयावह स्थिती आहे. खड्डे भरण्याची मलमपट्टी सुरू आहे. पेवर ब्लॉक केवळ काही ठिकाणीच लावले गेले आहेत. त्यामुळे महामार्गावरील खड्ड्यांची साडेसाती संपण्याची शक्यता नाही. त्यामुळे महिनाभराने येणाऱ्या गणेश उत्सवात भक्तांचे कंबरडे मोडणार आहे. चौपदरीकरण कामाचे ओझे उचलणाऱ्या महामार्ग विभागाकडे साधनसामग्री व मनुष्यबळाची वानवा असल्याने खड्ड्यांचे ओझे अधिकच जड झाले आहे.
एस. टी. बस, खासगी बस, कार अशा वाहनांनी मुंबईकर कोकणातील आपल्या गावी गणेश उत्सव साजरा करण्यासाठी पुढील पंधवड्यापासूनच येणार आहेत. आरक्षण आधीच फुल्ल झाली आहेत. अशा स्थितीत मुंबई - गोवा महामार्गावरील खड्ड्यांचा विषय विधिमंडळाच्या अधिवेशनातही गाजला. मात्र, त्यावेळी महामार्गावरील खड्डे लाल मुरूम, बॉक्साईट, जांभा दगड, खडी, डांबर याद्वारे भरण्याचा प्रयत्न महामार्ग विभागाने केला. परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही.
शासनाने गणेशोत्सवापूर्वी महामार्गावरील खड्डे भरले जातील, गणेशभक्तांना कोणताही त्रास होणार नाही, असे आश्वासन अधिवेशनात दिले आहे. त्यानुसार गेल्या आठवड्यापासून रत्नागिरी जिल्ह्यातील महामार्गावर काही ठिकाणी पेवर ब्लॉकद्वारे खड्डे भरण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. पेवर ब्लॉकने खड्डे भरण्याचा हा प्रयोग कितपत यशस्वी होणार, याबाबत अद्याप काहीही सांगता येण्याजोगी स्थिती नाही. मात्र, माती, खडी, डांबर याप्रमाणे पेवर वाहून जाणार नाहीत. परंतु अवजड वाहनांमुळे हे पेवर ब्लॉक फुटणार नाहीत, याची खात्री सध्यातरी देता येणार नाही.
ठेकेदारांमार्फत पेवर ब्लॉकने महामार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम गेल्या आठवड्यात सुरू केले गेले आहे. उत्सवाला अवघा महिना उरला आहे. महामार्गावर अनेक ठिकाणी रस्ता खड्डयात शोधावा लागत आहे. इतकी महामार्गाची स्थिती दयनीय झाली आहे. पनवेलपासून पुढे कोकणात येताना महामार्गाची जागोजागी चाळण झाल्याने पेवर ब्लॉकचे ठिगळ किती ठिकाणी जोडणार, असा सवालही निर्माण झाला आहे. हे काम येत्या महिनाभरात पूर्ण होण्याची शक्यता कमी असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गणेभक्तांच्या वाट्याला खड्डेच येणार असल्याने संताप व्यक्त होत आहे.
जिल्ह्यातील १६१ कशेडी रेस्टहाऊस ते २०५ परशुराम घाट या मार्गावरील खड्डे दुरुस्तीचे काम महाड महामार्ग विभागाकडे सोपवण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील काम रायगड विभाग करणार आहे. त्यामुळे हे काम कितपत काळजीपूर्वक केले जाईल, याबाबत रत्नागिरीकरांच्या मनात शंका आहे.
त्यापुढील आरवलीपर्यंतच्या विभागातील महामार्गावरील खड्डे बुजवण्याचे काम चिपळूण उपविभागाकडे आहे. रत्नागिरी विभागांतर्गत असलेल्या महामार्गावर आंबेड, मानसकोंड, बावनदीच्या पुढे संगमेश्वरकडे जाणाऱ्या महामार्गाचा भाग, कुरधुंडा ते थेट वाकेड (लांजा) पर्यंतचा भाग येथेही अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. वाकेडपुढील खारेपाटण, कणकवली, कुडाळ व सावंतवाडीपर्यंतच्या महामार्गाचीही खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. कणकवली ते सावंतवाडीपर्यंतच्या महामार्गावर मोठे दगड भरून खड्डे बुजवण्यात आले आहेत. तरीही खड्डे तसेच आहेत. या मार्गावरून प्रवास करणे म्हणचे हाडे खिळखिळी करून घेण्यासारखीच स्थिती आहे.
रत्नागिरी विभागाअंतर्गत असलेल्या आरवली ते वाकेड महामार्गावरील खड्डे पेवर ब्लॉकने बुजवण्याचे काम सुरू आहे. आंबेड, मानसकोंड येथील रस्त्यावरील खड्डे पेवर ब्लॉकच्या माध्यमातून बुजवले जात आहेत. कुरधुंडा येथेही महामार्गावर खड्डे बुजवले जात आहेत. मुंबई-गोवा महामार्गाचे डांबरीकरण करून किती कालावधी झाला. काम योग्य दर्जाचे झाले नाही का? रस्ता डांबरीकरणाचा दर्जा सांभाळला जात नसल्याने खड्ड्यांची समस्या असेल तर त्याबाबत ठेकेदारांना जाब का विचारला जात नाही, यासारखे प्रश्न कोकणवासीयांना पडले आहेत.