काँग्रेसच्या पाठपुराव्यामुळेच महामार्गाचे काम

fsharetweetwhatsapp

काँग्रेसच्या पाठपुराव्यामुळेच महामार्गाचे काम

By admin | Published: February 1, 2016 12:42 AM2016-02-01T00:42:49+5:302016-02-01T00:42:49+5:30

नारायण राणे : आंबेगाव येथे मंदिराचा जीर्णोद्धार

सावंतवाडी : कोकणचा खरोखरच विकास करायचा असेल, तर कोकणात रेल्वे वर्कशॉप, इंजिनियरिंग, पॉवर प्रोजेक्टचे प्रकल्प आणा. मात्र, कोकणात अणुऊर्जा केमिकलसारखे प्रकल्प आणून कोकण अधोगतीकडे नेण्याचा युती सरकारचा डाव असल्याचा आरोप काँग्रेस नेते नारायण राणे यांनी केला. इंदापूर ते झाराप महामार्गाचे चौपदरीकरण व्हावे, यासाठी काँग्रेसनेच पाठपुरावा केला. आता भाजप फक्त भूमिपूजन करून ठेकेदार नेमण्याचे काम करेल, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
आंबेगाव येथे श्री देव लिंग क्षेत्रपाल मंदिर जीर्णोध्दार भूमिपूजन कार्यक्रम सोहळा पार पडला. या मंदिराचे भूमिपूजन माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, तालुकाध्यक्ष संजू परब, पंचायत समिती सभापती प्रमोद सावंत, जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती आत्माराम पालयेकर, काँग्रेस प्रवक्ते डॉ. जयेंद्र परूळेकर, आंबेगाव माजी सरपंच वासुदेव परब, गुरूनाथ पेडणेकर, जिल्हा सरचिटणीस मंदार नार्वेकर, अ‍ॅड. दिलीप नार्वेकर, रविंद्र मडगावकर, प्रमोद गावडे, राजन भगत आदी उपस्थित होते.
नारायण राणे म्हणाले, जेवढे आपण देवाला महत्त्व देतो, तेवढेच महत्त्व शिक्षणालाही द्या. आजच्या युगात मुलांना संगणकाचे ज्ञान असणे गरजेचे आहे. उद्याच्या लढायाही संगणकानेच होतील, एवढी क्रांती आजच्या काळात संगणकांनी केली आहे. यामुळे या देवळाच्या बाजूला संगणक प्रशिक्षण केंद्र सुरू व्हावे, यासाठी आपण आवश्यक ती मदत करू, असे सांगितले. योग्य वेळेत मुलांना योग्य ते ज्ञान दिले, तर कर्तृत्ववान नागरिक उद्याच्या काळात संबोधले जातील. जिल्ह्यात विकासालाही खिळ बसली असून, शिक्षक कर्मचाऱ्यांमध्ये कपातीचे धोरण सरकारने अवलंबल्याने शिक्षणाचाही दर्जा खालावत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. पालकमंत्री या पदाची शान गेली असून, नियोजन बैठकीतून उठून जाणारा कधी पालकमंत्री असू शकतो का, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
आम्ही जिल्ह्याचा विकास करताना स्वार्थ ठेवला नाही. त्यामुळे आजही राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक माझ्याकडे येतात. उद्योगमंत्री असताना अनेकांना रोजगार दिला. पण युती सरकार आले आणि अच्छे दिनासाठी आम्हाला पंचांग घेऊन बसावे लागते. तरीही यांचे अच्छे दिन येत नाहीत, अशी कोपरखळी भाजपला मारली. डॉ. जयेंद्र परूळेकर यांनी युती शासनावर सडकून टीका केली. पालकमंत्री घोषणा करतात, पण प्रत्यक्षात काय करीत नाहीत. म्हणून जनतेने आता सावध व्हावे, असे आव्हानही त्यांनी यावेळी केले.
सल्लागार समितीचे अध्यक्ष वासुदेव परब यांनी, गावाच्या विकासासाठी राणे यांच्या कारकिर्दीत कोट्यवधी रूपयांची कामे झाली असल्याचे सांगितले. (वार्ताहर)
असा राणे होणे नाही
मी कधीही कोणाच्या टक्केवारीत नाही. माझ्यावर कसला आरोप नाही, मी कुणाकडे जेवतही नाही. मग माझ्या विरोधात वातावरण का निर्माण केले जाते, असा सवाल काँग्रेस नेते नारायण राणे यांनी करीत जिल्ह्यात माझ्यासारखे काम कोणी केले नाही आणि कोण करणारही नाही, असा नारायण राणे पुन्हा होणे नाही, असे भावोद्गार राणे यांनी यावेळी काढले.

Web Title: Highway work due to Congress's follow-up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.