हिंदवी स्वराज्याला प्रशासकीय शिस्त मिळाली
By Admin | Published: January 9, 2016 12:09 AM2016-01-09T00:09:00+5:302016-01-09T00:47:41+5:30
चारुदत्त आफळे : दुसऱ्या दिवशी कीर्तन महोत्सवाला पाच हजार श्रोत्यांची गर्दी; नानासाहेब पेशव्यांची गाथा
रत्नागिरी : हिंंदवी स्वराज्याचा कारभार पुण्यात नेल्यानंतर नानासाहेब पेशव्यांनी भविष्याचा विचार करून पुण्याचे सुशोभिकरण करण्यावर भर दिला. कष्टकरी व सेवेकरी दहा ज्ञातीतील लोकांना कर माफ केला. मुळा, मुठा नद्यांचे ९० टक्के पाणी शेतकऱ्यांचे केले. कात्रजच्या जलाशयात मोठे हौद बांधून दगडी नळ्यांद्वारे पुणे शहरात पाणीपुरवठा केला. नानांच्या दूरदृष्टीने हिंंदवी स्वराज्याला प्रशासकीय शिस्तही मिळाली, असे प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांनी केले.
स्व. महाजन क्रीडा संकुल येथे आयोजित कीर्तन महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी ते बोलत होते. यावेळी पाच हजार श्रोते उपस्थित होते. यावेळी बुवांना हर्षल काटदरे, प्रसाद करंबेळकर, राजा केळकर आणि महेश सरदेसाई यांनी साथसंगत केली. आफळे यांनी पूर्वरंगामध्ये ‘आपुलिया हिता जो जागता’, ‘धन्य मातापिता तयाचिया’ हा अभंग निरूपणाला घेतला. भगवद्गीतेमधील कर्मयोग, सावतामाळीची कथा त्यांनी सांगितली. मंत्रपुष्पांजली म्हणजे सर्व हिंदूंचे राष्ट्रगीत आहे. नाशिकला झालेल्या कुंभमेळ्यामध्ये सर्व पंथांनी मिळून दहा श्लोकांचे स्तोत्र तयार केले आहे. ते सर्व पंथांनी म्हणावे. हिंंदू म्हणून एकत्र येण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, सर्व हिंदूंनी एकत्र असल्याची भावना निर्माण होण्यासाठी हे स्तोत्र म्हणावे, असे सांगितले.
आफळे म्हणाले की, उत्तररंगामध्ये बाजीरावांनंतर पेशवेपद कोणाला द्यावे हा प्रश्न होता. छत्रपती शाहूंनी बाजीरावांचे बंधू नानासाहेब यांना १८व्या वर्षी हे पद दिले. त्यांनी वीस वर्षांच्या कालावधीमध्ये अनेक युद्धे जिंंकली आणि प्रशासकीय घडी नीट बसवली. पहिल्या चार वर्षांनी बुंदेलखंडामध्ये समेट घडवला. त्यासाठी बाजीराव-मस्तानी पुत्र समशेरबहाद्दर याची मदत घेतली. एका बाजूला पोर्तुगीजांचा धोका व दुसरीकडे सावूनरचा नबाब कोल्हापूरवर चाल करून येणार होता. त्यावेळी तुळाजी आंग्रेंच्या आरमाराने हिंंदवी स्वराज्याविरोधात बंड पुकारल्याने नानासाहेबांनी क्षणभर इंग्रजांशी हातमिळवणी केली. नंतर नानांनी नवीन आरमार उभारून ते समृद्ध करण्यासाठी प्रयत्न केले, असे सांगितले. गणपती हे पेशव्यांचे आराध्य दैवत. त्यामुळे थेऊरच्या गणपतीला पेशव्यांची सुवर्णतुला केली जायची. नानासाहेबांची तीनवेळा तुला झाली आणि त्यातील मोहरा दारिद्र्यरेषेखालील लोकांना देण्यात आल्या, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
नानांनी खरमरीत पत्रातून ठणकावले
बुंदेलखंड, बंगालच्या लोकांनी आम्ही पेशव्यांना कर का द्यायचा ? अशी बंडाळी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, नानांनी खरमरीत पत्र लिहून त्यांना ठणकावले. तुमच्या प्रांताच्या संरक्षणासाठी मराठ्यांच्या फौजा येतात. तुमची सुरक्षा आम्ही करतो त्यासाठी हा कर दिला पाहिजे. हा कर हिंंदवी स्वराज्यासाठीच वापरला जातो. आजही भारतामध्ये अशी दुहीची भाषा केली जाते. नागालँड, मिझोराम आदी राज्ये आमचा दिल्लीशी काय संबंध असे विचारतात. अहिंदूंची संख्या वाढल्यानंतर भारताने हजारो वर्षे अन्याय पाहिला आहे. इंग्रजांनी ब्राह्मण आणि इतर हिंदूंमध्ये फूट पाडली. तेव्हाच त्यांना राज्य करता आले. मात्र, आज हिंदूंनी जागरूक राहण्याची गरज आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.