सीआरझेडमुळे विकासात बाधा
By admin | Published: February 12, 2016 10:14 PM2016-02-12T22:14:44+5:302016-02-12T23:45:20+5:30
गुहागर तालुका : पर्यटनाच्या धर्तीवर पुरेशा सोयीसुविधा नाहीत; जाचक अटीतून सुटकेची मागणी
मंदार गोयथळे -- असगोली--समुद्रकिनारी वसलेल्या गुहागर शहराला अल्पावधीतच पर्यटन केंद्राचा दर्जा मिळाला. पर्यटनातून जागतिक नकाशावर पोहोचलेल्या या शहरात वर्षाकाठी लाखो पर्यटक हजेरी लावतात. परंतु अजूनही पर्यटनाच्या धर्तीवर पुरेशा सोयीसुविधा या ठिकाणी उपलब्ध नाहीत. अर्ध्याहून अधिक शहराला लागू असलेला सीआरझेड कायदा याला कारणीभूत ठरत आहे.पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेल्या समुद्रचौपाटीलगत किंवा बाजारपेठेच्या ठिकाणी पर्यटनाच्या माध्यमातून काही हॉटेल्स, लॉजिंग व इमारती उभारुन पर्यटन विकसित करावयाचे झाल्यास हा कायदा त्यास प्रमुख अडथळा ठरत आहे. त्यामुळे अशा जाचक कायद्यातून गुहागर शहराची कायमची सुटका करावी, अशी मागणी गुहागरवासियांमधून केली जात आहे.
कोकणातील गुहागर शहराला फार मोठी समुद्रकिनारपट्टी लाभली आहे. सलग ७ किमी लांब असलेली गुहागर चौपाटी आशिया खंडातील एकमेव असावी. केवळ लांब नाही, तर पांढऱ्या शुभ्र वाळूने सजलेली ही चौपाटी आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वच्छ, सुंदर, पुरेशी रुंद व सुरु आणि नारळी-पोफळीच्या बागांच्या रांगांनी सजवलेली अशी एकमेव ही चौपाटी आहे. निसर्गाचे वरदान लाभलेल्या या समुद्रचौपाटीला पर्यटन वाढीच्या दृष्टीने अत्यावश्यक सोयीसुविधा निर्माण करुन देणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने तेथील नगरपंचायतीने काही पावले उचलली खरी. परंतु त्यामधून म्हणावा तसा आणि आवश्यक तो पर्यटन विकास झाला नाही.गुहागरच्या पर्यटन विकासासाठी खासगी, व्यापारी, व्यावसायिक व भांडवलदार यांच्या माध्यमातून पुढाकार घेऊन समुद्रचौपाटीलगत किंवा शहरातील मुख्य बाजारपेठेमध्ये अत्याधुनिक हॉटेल्स, लॉजिंग व अन्य व्यापारी इमारती उभ्या करून आवश्यक त्या सोयीसुविधा निर्माण करुन द्यावयाचे म्हटले तरी त्याला ५०० मीटरचा सीआरझेड कायदा आडवा येत आहे.
अर्ध्याहून अधिक शहर या सीआरझेडबाधीत झाले आहे. पर्यटनाच्या माध्यमातून या ठिकाणी कोणतेही साधन उभे करायला खासगी भांडवलदार व व्यावसायिकांना मोठे अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे गेल्या १० वर्षात पर्यटन क्षेत्रात गुहागर प्रसिद्धीस येत असताना गुहागरच्या समुद्रालगत एकही पंचतारांकित हॉटेल किंवा अन्य कोणताही पर्यटन प्रकल्प उभा राहिलेला दिसत नाही.
ग्रामपंचायतीची नगरपंचायत झाल्यानंतर सीआरझेड शिथील होऊन तो २०० मीटरपर्यंत येतो. परंतु गुहागर शहराला हा कायदा अद्याप शिथिल झालेला नाही. याचा फटका उद्योजक व व्यापाऱ्यांना तर नाहक त्रास स्थानिक नागरिकांसह शासकीय कार्यालयांनाही सहन करावा लागत आहे. या सीआरझेडप्रश्नी प्रशासनाने लक्ष घालून तो शिथील करण्यासाठी राज्य व केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवून पाठपुरावा करावा. तसेच पर्यावरणमंत्री रामदास कदम, केंद्रीयमंत्री अनंत गीते, गुहागरचे आमदार भास्कर जाधव व माजी आमदार डॉ. विनय नातू या सर्वांनी पक्षभेद विसरुन पर्यटनक्षेत्र म्हणून नावारुपास येत असलेल्या गुहागरच्या विकासासाठी शहराला पूर्वापार लावण्यात आलेल्या सीआरझेडच्या जाचक अटीमधून बाहेर काढावे, अशी मागणी शहरवासीयांकडून होत आहे.
पर्यटनाच्यादृष्टीने महत्त्वाचे म्हणजे चौपाटीवर रात्रीच्यावेळी पुरेसा वीज पुरवठा उपलब्ध करणे, पर्यटकांना सुलभ शौचालय, समुद्रस्नान करुन आल्यानंतर गोड पाण्याच्या आंघोळीची आणि चेंजिंग रुमची व्यवस्था करणे, या सुविधा आजही येथे नाहीत.