संविधानानुसार देशात हिंदु राष्ट्र सुरू - मंत्री नितेश राणे; उद्धव ठाकरेंवर सोडले टीकास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 13:28 IST2025-01-25T13:27:39+5:302025-01-25T13:28:17+5:30
ओरोस : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसार हिंदू राष्ट्र सुरू आहे, असा महत्त्वपूर्ण निकाल काल उच्च न्यायालयाने दिला आहे. ...

संविधानानुसार देशात हिंदु राष्ट्र सुरू - मंत्री नितेश राणे; उद्धव ठाकरेंवर सोडले टीकास्त्र
ओरोस : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसार हिंदू राष्ट्र सुरू आहे, असा महत्त्वपूर्ण निकाल काल उच्च न्यायालयाने दिला आहे. त्यात कोणी शरिया कायदा लागू करत असेल तर खपवून घेणार नाही. भोंग्याबाबत काही निर्देश पोलिस खात्याला दिले आहेत. त्यामुळे न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची १०० टक्के अंमलबजावणी आमचे हिंदुत्ववादी सरकार करेल. कोणी कायदा भंग करीत असल्यास कठोर शिक्षा करेल, अशी माहिती राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असलेल्या मंत्री नितेश राणे यांनी जिल्हाधिकारी बैठक सभागृहात पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली. यावेळी मंत्री राणे म्हणाले की, यापुढे कोणाचीही दादागिरी चालणार नाही. इस्लाम राष्ट्र बनविण्याचे मनसुबे खपवून घेतले जाणार नाहीत. पाच वेळा भोंगे वाजवणाऱ्यांनी स्वतः भोंगे बंद करावेत. आम्हाला संघर्ष नको, कायदा सुव्यवस्था हवी आहे. जसा हिंदू समाज न्यायालयाच्या नियमांचे पालन करतो. सण साजरे करतो. तशीच अन्य धर्मांच्या लोकांकडून अपेक्षा आहे.
कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही. न्यायालयाच्या चौकटीत राहून प्रत्येकाने आपले काम करावे. सकाळी ५ वाजता भोंगे वाजताना दिसले, तर कडक कारवाई निश्चित होणार. आता कोणाला कायदा तोडायला देणार नाही. त्यासाठी आपण पुढाकार घेऊ. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसार आपला देश काम करतो, हे पुन्हा एकदा न्यायालयाच्या आदेशानुसार सिद्ध झाले असल्याचे ते म्हणाले.
स्वबळावर लढण्याची कुवत आहे का?
उद्धव ठाकरे यांनी स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे, यावर बोलताना मंत्री राणे यांनी स्वबळावर लढण्यासाठी पात्रता लागते. त्यांची स्वबळावर लढण्याची कुवत आहेत का? अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.