आता 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे' स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान!, राज्य परिवहन महामंडळाचे आयोजन
By सुधीर राणे | Published: May 10, 2023 05:10 PM2023-05-10T17:10:51+5:302023-05-10T17:11:13+5:30
विजेत्या बसस्थानकांना अडीच कोटींची बक्षीसे
कणकवली : दोन वर्षाचे कोरोना संकट, त्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांचा पाच महिन्यांचा संप यामुळे एसटीच्या प्रवासी संख्येत घट झाली आणि राज्य परिवहन महामंडळाला आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले. मात्र गेल्या वर्षभरापासून एसटी महामंडळाने पुन्हा एकदा एसटीचा गाडा रुळावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून राज्यात १ मे ते ३० एप्रिल २०२४ या कालावधीत 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे' स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान राबविण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. हे अभियान स्पर्धात्मक स्वरूपात असून उत्कृष्ट बसस्थानकांना रोख बक्षीसे देवून गौरविण्यात येणार आहे.
या अभियानासाठी राज्य परिवहन महामंडळामध्ये मध्यवर्ती स्तर व विभागीय स्तर अशा दोन समित्या स्थापन केल्या जाणार आहेत. स्वच्छता अभियानाचा आराखडा तयार करणे, मुल्यांकनासाठी कालबध्द कार्यक्रम निश्चित करणे, अभियानाचे सर्व्हेक्षण करून योग्य बदलांसह मार्गदर्शन करणे ही या समितीची कार्यकक्षा आहे. महामंडळाच्या सर्व स्थानकांचे भौगोलिक स्थान, प्रवासी चढउतार, बस स्थानक, बसफेऱ्यांची संख्या समान नाही, अर्थात सर्वांना समान संधी मिळण्यासाठी काही निकषांच्या आधारे बसस्थानकांचे वर्गीकरण करण्यात आले आहे.
विभागस्तरावर विभाग नियंत्रकांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली जाणार आहे. त्यात विभागीय स्थापत्य अभियंता, उपयंत्र अभियंता, विभागीय कामगार अधिकारी, त्या विभागातील ज्येष्ठ पत्रकार, प्रवासी संघटनांचे प्रतिनिधी यांचा समावेश असणार आहे. समितीने किमान दोन महिन्यांच्या अंतराने मध्यवर्ती समितीने ठरवून दिलेल्या विभागाची तपासणी करायची आहे. महामंडळाच्या ६ प्रदेशामध्ये प्रत्येकी ९ याप्रमाणे प्रादेशिक स्तरावर ५४ बसस्थानके पुरस्कारासाठी निवडण्यात येणार आहेत. एकूण गुणांच्या ७५ टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त बसस्थानकांचा विचार या पुरस्कारासाठी केला जाणार आहे.
विजेत्या बसस्थानकांना अडीच कोटींची बक्षीसे !
प्रादेशिक स्तरावर अ वर्ग बसस्थानक प्रथम क्रमांक रुपये १० लाख, चषक व प्रशस्तीपत्र, द्वितीय ५ लाख व प्रशस्तीपत्र, तृतीय २.५० लाख व प्रशस्तीपत्र, ब वर्ग प्रथम रूपये ५ लाख, चषक व प्रशस्तीपत्र, द्वितीय २.५० लाख व प्रशस्तीपत्र, तृतीय १.५० लाख व प्रशस्तीपत्र, क वर्ग बसस्थानक प्रथम १ लाख चषक व प्रशस्तीपत्र, द्वितीय ५० हजार व प्रशस्तीपत्र, तृतीय २५ हजार व प्रशस्तीपत्र.
राज्यस्तरावर विजेत्या बसस्थानकाच्या पारितोषिकाची रक्कम अ वर्ग प्रथम क्रमांक रूपये ५० लाख, चषक व प्रशस्तीपत्र, ब वर्ग प्रथम क्रमांक रुपये २५ लाख चषक व प्रशस्तीपत्र आणि क वर्ग प्रथम क्रमांक रूपये १० लाख चषक व प्रशस्तीपत्र अशी बक्षीसे आहेत.