हिंद छात्रालय पुन्हा सुरु करणार - मल्लिकार्जुन माळगी

By admin | Published: April 28, 2017 05:56 PM2017-04-28T17:56:08+5:302017-04-28T17:56:08+5:30

समाजातील आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी म्हाळसाबाई भांडारकर ट्रस्टच्या माध्यमातून यावर्षीपासून हिंद छात्रालय पुन्हा सुरु करण्यात येणार आहे.

Hindus will resume hostel - Mallikarjuna Malgali | हिंद छात्रालय पुन्हा सुरु करणार - मल्लिकार्जुन माळगी

हिंद छात्रालय पुन्हा सुरु करणार - मल्लिकार्जुन माळगी

Next
>ऑनलाइन लोकमत
कणकवली, दि. 28 - समाजातील आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील  विद्यार्थ्यांसाठी म्हाळसाबाई भांडारकर ट्रस्टच्या माध्यमातून यावर्षीपासून हिंद छात्रालय पुन्हा सुरु करण्यात येणार आहे.  नवीन  शैक्षणिक वर्षापासून पहिली ते दहावी पर्यंतच्या  प्रत्येकी पंचवीस मुली आणि पंचवीस मुलांच्या निवास, न्याहारी, भोजन आणि इतर गरजांची पूर्तता कणकवली टेंबवाड़ी येथील ट्रस्टच्या जागेत करण्यात येणार असल्याची माहिती  भांडारकर ट्रस्टचे अध्यक्ष मल्लीकार्जून माळगी यांनी दिली.
येथील  विद्यामंदिर हायस्कूल मध्ये शुक्रवारी  मल्लिकार्जुन माळगी, विद्यामंदिर हायस्कुलचे मुख्याध्यापक हेमंत खोत आणि कणकवली  शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक अनिल डेगवेकर यांनी संयुक्तपणे  पत्रकार परिषद घेतली. यावेळी मल्लिकार्जुन माळगी यांनी हिंद छात्रालयाच्या उभारणीबाबत माहिती दिली. 
ते म्हणाले, कणकवलीत अप्पासाहेब पटवर्धन, साने गुरुजी तसेच तत्कालीन समाजसुधारक यांच्या प्रेरणेतून हिंद छात्रालय आणि म्हाळसाबाई भांडारकर ट्रस्टचे काम सुरू झाले. स्वातंत्र्यपूर्व काळात 1939 पासून त्यावेळच्या रत्नागिरी जिल्ह्यातील सामाजिक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थी- विद्यार्थिनींसाठी टेंबवाड़ी येथे वसतिगृह सुरू करण्यात आले होते. सन 1995 पर्यंत ही दोन्ही वसतिगृहे समाजातील उदारमतवादी कुटुंबाच्या आर्थिक मदतीने चालवण्यात येत होती. त्यानंतरच्या काळात आर्थिक अडचणींमुळे वसतिगृहाचे कामकाज बंद राहिले होते. आता पुन्हा सर्व जातीधर्माच्या गरीब मुलांसाठी हे हिंद छात्रालय आम्ही सुरू करीत आहोत.     
  शहरातील हिंद छात्रालयात विविध संस्थांच्या माध्यमातून सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रम सुरू असतात. त्यामुळे तेथे वसतिगृह कसे सुरू होणार? या प्रश्‍नावर बोलताना माळगी यांनी हिंद छात्रालयात राहणार्‍या मुलांना कसलेच अडथळे येणार नाहीत असे यावेळी स्पष्ट केले. तसेच सामाजिक, सांस्कृतिक व इतर उपक्रमांसाठी अन्य पर्याय उपलब्ध करून देण्यात येतील असेही ते म्हणाले.  हेमंत खोत म्हणाले, ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी आर्थिक अडचणीमुळे शिक्षणापासून वंचित राहतात. अनेक मुलांना शिक्षणासाठी शहरातील नातेवाइकांच्या घरी पाठविले जाते. पण तेथे त्यांना चांगली वागणूक मिळत नाही. आता गरीब घटकातील विद्यार्थ्यांना हक्काचे वसतिगृह हिंद छात्रालयाच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. हिंद छात्रालयातील वसतिगृहात राहणार्‍या सर्व विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च विद्यामंदिर हायस्कूल उचलणार आहे.
अनिल डेगवेकर म्हणाले, गरीब घटकांतील मुलांचे भवितव्य घडविण्यासाठी अनेकांकडून मदतीचे हात पुढे येत आहेत. तो हात आम्ही हिंद छात्रालय आणि विद्यामंदिर हाययस्कूलच्या माध्यमातून गरीब विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणार आहोत. हिंद छात्रालयात येणार्‍या सर्व विद्यार्थ्यांचा दहावी पर्यंतचा खर्च आम्ही उचलणार आहोत. त्यासाठी अनेक दानशूर व्यक्तींनीही मदत देण्याची ग्वाही दिली आहे.असेही ते म्हणाले.
 
लोकोपयोगी उपक्रमात सहभागाचे आवाहन !
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुणी शिक्षणापासून वंचित राहणारी मुले असतील तर त्यांच्या नावाचा अर्ज आणि विद्यार्थ्यांची किंवा त्याच्या पालकांच्या आधारकार्डची झेरॉक्स प्रत विद्यामंदिर हायस्कूल येथे आणून द्यावी. तसेच हिंद छात्रालयाच्या लोकोपयोगी उपक्रमात जिल्ह्यातील जनतेने सहभागी व्हावे असे आवाहन मल्लिकार्जुन माळगी, हेमंत खोत आणि अनिल डेगवेकर यांनी यावेळी  केले.
 

Web Title: Hindus will resume hostel - Mallikarjuna Malgali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.