सावंतवाडी बसस्थानकातील हिरकणी
By admin | Published: December 16, 2014 10:00 PM2014-12-16T22:00:47+5:302014-12-16T23:42:07+5:30
कक्षाला कुलूप; महिलांची गैरसोय
पंचायत समितीची बैठक : रोहिणी गावडे यांनी लक्ष वेधले
सावंतवाडी : तालुक्यातील एसटी बसस्थानकातील हिरकणी कक्षाला नेहमी कुलूप असल्याने गावातून येणाऱ्या महिलांची गैरसोय होत आहे. हिरकणी कक्ष शोभेसाठी बांधला आहे का? असा सवाल पंचायत समिती सदस्या रोहिणी गावडे यांनी पंचायत समितीच्या मासिक बैठकीत केला. हिरकणी कक्षाचा लाभ महिलांना मिळण्यासाठी त्याठिकाणी तसा फलक लावून कक्षाच्या चाव्यांचीही उपलब्धता करून द्यावी, अशी मागणी गावडे यांनी सभेत केली.
बैठक सभापती प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी उपसभापती महेश सारंग, सहाय्यक गटविकास अधिकारी मोहन भोई, माजी सभापती प्रियांका गावडे, सदस्य विनायक दळवी, लाडोबा केरकर, अशोक दळवी, सुनयना कासकर, श्वेता कोरगावकर, रोहिणी गावडे, गौरी आरोंदेकर उपस्थित होते.
ग्रामपंचायतीमधील विविध कामांना मंजुरी मिळून निधी प्राप्त होतो. परंतु ग्रामपंचायत वेळीच कागदपत्रांची पूर्तता करीत नसल्याने अनेक कामे रखडली आहेत. तालुक्यातील दहा ग्रामपंचायतींना कामाच्या निष्काळजीपणासंदर्भात नोटिसा बजाविण्यात येणार असल्याचा ठराव सभापतींनी घेतला. जानेवारी ते डिसेंबर २०१४ या कालावधीत वर्षभर अंगणवाडीतील मुलांच्या आहाराकरिता सरासरी धान्यपुरवठा केला गेला नाही. तर दुसरीकडे कुपोषित मुलांना सुधारण्याकरिता शासन प्रयत्न करीत असल्याचे चित्र दिसत आहे. मुलांना जर वेळीच पोषण आहार दिल्यास कुपोषणमुक्त अभियान राबविण्याची आवश्यकताच भासणार नाही, असे पंचायत समिती सदस्या श्वेता कोरगावकर यांनी सुनावले. तसेच यातील कार्यरत अंगणवाडी सेविकांचे आॅगस्टपासून मानधनही बंद झाले आहे. त्यांच्या वेतनात वाढ होण्यासाठी प्रयत्न व्हावेत, अशीही मागणी केली.
पाणीटंचाई आराखडा तयार करतेवेळी जुन्या कामांना प्रथम प्राधान्य देऊन नवीन आराखडा तयार करावा, असा ठरावही घेण्यात आला. यामध्ये पाण्याच्या पाईप लाईनच्या दुरुस्तीचा जास्त समावेश असून याकडे गांभिर्याने लक्ष देण्याबाबत सर्वांचे एकमत झाले. बांदा परिसरातील शेतकऱ्यांना शेतीसाठी पाण्याचा साठा फारच कमी प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे उत्पादनातही घट होत असून शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. यासाठी तेरेखोल नदीवर इन्सुली ते बांदा यादरम्यान बंधारा बांधण्यात येईल. जेणेकरून या भागातील शेतकऱ्यांना शेतीसाठी मुबलक पाणी पुरवठा होऊन शेतीच्या उत्पादनातही वाढ होईल, अशी मागणी नारायण राणे यांनी केली.
पावसाळ्यातील पुरामुळे आंबोली परिसरातील नुकसानी झालेल्या ग्रामस्थांना अद्याप नुकसान भरपाई मिळाली नाही. ही रक्कम पूरग्रस्तांना लवकरात लवकर मिळावी, अशी मागणी गावडे यांनी केली. निरवडे येथील शाळेची इमारत निर्लेखित करून पाडलेली आहे. परंतु नवीन इमारतीसाठी अजूनही निधी मंजूर झालेला नसल्याने मुलांना गैरसोय होत आहे. त्यामुळे निर्लेखित इमारतींचा निधी दोन महिन्यात जमा करून शाळेचे काम सुरू करावे, अशी मागणी माजी सभापतींनी केली.
पंचायत समितीच्या बैठकीत मांडलेल्या प्रश्नांची उत्तरे लेखी स्वरुपात कोणत्याही सदस्यांना मिळत नाहीत. यापूर्वी प्रश्नांची उत्तरे लेखी स्वरुपात मिळत होती. त्यामुळे सभेत झालेल्या विविध प्रश्नांची उत्तरे लेखी स्वरुपात पाठवावीत, अशी मागणी प्रियांका गावडे यांनी केली. (वार्ताहर)