ऐतिहासिक ‘डाळपस्वारी’ला शाही थाटात सुरूवात
By admin | Published: April 9, 2015 10:44 PM2015-04-09T22:44:03+5:302015-04-10T00:24:27+5:30
श्री देव रामेश्वर संस्थान : आचरा परिसरात भक्तीमय वातावरण
आचरा : तीन वर्षांनी होणाऱ्या इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानच्या डाळपस्वारी उत्सवाला तोफांच्या सलामीने आणि हजारो भाविकांच्या साक्षीने गुरुवारपासून सुरुवात झाली. या उत्सवाची सुरुवात श्रींची स्वारी इतर तरंगासह पाच स्थळांना भेट देऊन दळ डाळपी समजावून बाहेर पडतोय..., ज्याचा वचन देतंय ता खरा करून अवसारी पाषाणी गणित एक करून रामेश्वराला सांगणे करून करण्यात आले.रामेश्वर मंदिराच्या आवारातील डाळप झाल्यानंतर तोफांच्या सलामीने व ढोलताशांच्या गजरात रवळनाथ, पावणाई, काळकाई, विठलाई आदी देवतांचे तरंग धावत रामेश्वर घाटीपर्यंत गेले. यानंतर रामेश्वर आणि पूर्वज वाजत गाजत घाटीपर्यंत आल्यावर तिथूनच लोकांची गाऱ्हाणी व ओट्या भरण्यास सुरुवात झाली. नंतर आचरा घाटी बाजारपेठमार्गे ‘श्रीं’ची स्वारी फुरसाई मंदिरात आली. तिथे आल्यावर मोठे डाळप करून भाविकांचे गाऱ्हाणे ऐकत मिराशीवाडी येथील डाळप करून सायंकाळी उशिरा ‘श्रीं’ची स्वारी नागझरी येथील गिरावळ मंदिरात विसावली. उत्सवात सहभागी झालेल्या भाविकांसाठी मुंबईस्थित वास्तुशास्त्रज्ञ मधुकर लाड, संजय घाडी मित्रमंडळ, पर्डेकर मित्रमंडळ, व्यापारी मंडळ, मिराशीवाडी ग्रामस्थ, शेखर मोर्वेकर आदींतर्फे ठिकठिकाणी अल्पोपहार, शीतपेयांची व्यवस्था करण्यात आली होती. केंद्रशाळा आचरा नं. १ येथील कथामालेच्या विद्यार्थ्यांनी उपस्थित भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती. सात दिवस चालणाऱ्या उत्सवात चाकरमान्यांनी हजेरी लावली होती. (वार्ताहर)
५भंडारवाडीमध्ये ‘श्रीं’ची स्वारी; स्वागताची तयारी पूर्ण
इनामदार श्री देव रामेश्वराच्या संस्थानी थाटाच्या डाळपस्वारीला गुरुवारपासून सुरुवात झाली असून बाजारपेठ फुरसाई मंदिर मिराशीवाडी ब्राह्मण, श्री देवी गिरावळ येथील डाळपे केल्यानंतर १० एप्रिल रोजी ‘श्रीं’च्या स्वारीचे आगमन आचरा भंडारवाडी, बौद्धवाडी येथे होऊन रात्री उशिरापर्यंत गाऊडवाडी येथील श्री देव ब्राह्मणदेव मंदिरात ‘श्रीं’च्या स्वारीचा मुक्काम होणार आहे. गुरुवारी श्री देवी गिरावळ मंदिरातील रास पोटाळण्याचा विधी झाल्यानंतर सायंकाळी ‘श्रीं’च्या स्वारीचे आगमन आचरा भंडारवाडी, बौद्धवाडी महारथळ येथे होणार असून आचरा काझीवाडा, शेख मोहल्ला या मार्गे श्री देव ब्राह्मणदेव मंदिर आचरा गाऊडवाडी येथे रात्री उशिरा ‘श्रीं’ची स्वारी मुक्कामी पोहोचणार आहे.