ओटवणेत ऐतिहासिक दसरोत्सव 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 04:44 PM2017-10-02T16:44:16+5:302017-10-02T16:48:40+5:30

Historical Diaspora in Ottawa | ओटवणेत ऐतिहासिक दसरोत्सव 

ओटवणे गावाला ऐतिहासिक पाचशे वर्षांची गौरवशाली परंपरा लाभलेली आहे. येथील श्री देव रवळनाथ पंचायतन देवस्थानचा नवमीचा दसरा मोठ्या थाटात भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.

googlenewsNext
ठळक मुद्दे श्री देव रवळनाथ पंचायतन देवस्थानची पाचशे वर्षांची परंपरा सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कर्नाटक, गोवा राज्यातील भाविकांची दर्शनासाठी गर्दी शिवलग्न सोहळा पारंपरिक थाटात पारतिन्ही तरंगांच्या साक्षीने भाविकांचा ‘इंगळे न्हाणे’ हा आगळावेगळा कार्यक्रम

ओटवणे (सिंधुदुर्ग ), 2  : ओटवणे गावाला ऐतिहासिक पाचशे वर्षांची गौरवशाली परंपरा लाभलेली आहे. येथील श्री देव रवळनाथ पंचायतन देवस्थानचा नवमीचा दसरा मोठ्या थाटात भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. सावंतवाडी तालुक्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तसेच कर्नाटक, गोवा राज्यातील भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. 


जिल्ह्यातील जागृत देवस्थान अशी ख्याती असलेल्या श्री सातेरी रवळनाथ पंचायतनचा दसरोत्सव मोठ्या थाटात पार पडला. या देवस्थानचा दसरोत्सव संस्थान काळापासून राजेशाहीचा सण म्हणून प्रसिद्ध आहे. खंडेनवमी व विजयादशमी असे दोन दिवस साजरा होणाºया उत्सवाला भाविकांची अलोट गर्दी झाली होती. 


 ओटी भरणे, केळी ठेवणे, नारळ ठेवणे, नवस बोलणे-फेडणे आदी धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल मंदिरात दिवसभर सुरू होती. यावेळी सावंतवाडी कोषागरात असलेली सोन्याची तरंगे व असंख्य अलंकारांचा साज भाविकांना दसरोत्सवाच्या निमित्ताने पहावयास मिळाला.  मुंबईतील चाकरमान्यांसह अन्य राज्यातूनही भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


खंडेनवमीला रवळनाथाच्या पालखीसह सातेरी, रवळनाथ या सुवर्ण तरंगांसह निशाणकाठीने मंदिराभोवती सवाद्य पाच प्रदक्षिणा घातल्या. त्यानंतर शिवलग्न सोहळा पारंपरिक थाटात पार पडला. आपट्याची पाने लुटून स्रेह व श्रध्दा या भावना वृद्धींगत करण्याचा हृदयस्पर्शी सोहळा पार पडला. त्यानंतर तिन्ही तरंगांच्या साक्षीने क्लेश, पीडा परिहारार्थ भाविकांचा ‘इंगळे न्हाणे’ हा आगळावेगळा कार्यक्रम झाला. 


जिल्ह्यातील प्रमुख देवस्थानांप्रमाणे ईश्वरीय अस्तित्वाचे अद्भुत दर्शन घडविणारे हे तीर्थक्षेत्र असून सूर्योदय व सूर्यास्ताची किरणे श्री रवळनाथाच्या चरणी पडतात, अशी या मंदिराची रचना केली आहे. भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या रवळनाथाच्या दसरोत्सवासाठी ओटवणे गावात भाविकांचा महापूर लोटला होता. 

ओटवणे दसरोत्सवासाठी भाविकांनी गर्दी केली होती. (महेश चव्हाण)

Web Title: Historical Diaspora in Ottawa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.