सिंधुदुर्गातील आचऱ्यात शाही थाटात ऐतिहासिक रामनवमी उत्सवास प्रारंभ
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: March 23, 2023 05:36 PM2023-03-23T17:36:59+5:302023-03-23T17:37:26+5:30
रामनवमी उत्सवात विविध संगीत कार्यक्रमांची मेजवानी
आचरा (सिंधुदुर्ग) : आचरा येथील इनामदार श्रीदेव रामेश्वर संस्थानच्या रामनवमी उत्सवास बुधवारी संस्थानी थाटात सुरुवात झाली. हा उत्सव हनुमान जयंतीपर्यंत चालणार आहे. रामेश्वर मंदिरात रघुपतीच्या मूर्तिचे आगमन झाले. या उत्सवात आपली कला सादर करण्यासाठी कराड, सांगली, सातारा, कोल्हापूर आदी भागांतून बँडपथके दाखल झाली आहेत.
बुधवारी सायंकाळी शाही थाटात ''श्रीं''च्या पाषाणाला न्हावू घालण्यात आले. त्यानंतर पुराण वाचन करण्यात आले. नंतर श्रींच्या दरबारात हजेरी लावलेल्या कलाकारांनी आपली गायन सेवा सादर केली. तसेच रात्री संस्थानाच्या शाही लवाजम्यासह पारंपरिक थाटात श्री विष्णूची मूर्ती, शृंगारलेली पालखीत विराजमान झाली. ह. भ. प. संजय करताळकर (नागपूर) यांचे कीर्तन असा दिनक्रम रोज ललिता पंचमीपर्यंत चालणार आहे.
रामनवमी उत्सवात विविध संगीत कार्यक्रमांची मेजवानी
शुकवार, २४ रोजी सुधांशु सोमण (मिठबाव) यांचे गायन, शनिवार, २५ रोजी सायंकाळी ५ वाजता गायन कर्यक्रम, रविवार, २६ रोजी सकाळी १० वाजता दिलीप ठाकूर यांचे गायन, सायंकाळी ५ वाजता गायिका समीक्षा भोबे - काकोडकर, गोवा यांचा शास्त्रीय गायन कार्यक्रम होणार आहे. सोमवार, २७ रोजी गायक विनय वझे व सहकारी यांचे गायन, मंगळवार, २८ रोजी सकाळी १० वाजता व सायंकाळी ५ वाजता गायक नितीन ढवळीकर यांची गायन मैफील, बुधवार, २९ रोजी सायंकाळी ५ वाजता गायक भाग्येश मराठे (ठाणे) यांची संगीत मैफील.
३० मार्च रोजी रामनवमी उत्सव
गुरुवार, ३० रोजी रामनवमी उत्सव होणार असून, रामजन्माचे कीर्तन मिलिंदबुवा कुळकर्णी करणार आहेत. सायंकाळी ५ वाजता गायिका निराली कार्तिक (पुणे) यांचे गायन होणार आहे. शुक्रवार, ३१ मार्च रोजी सकाळी १० वाजता गायिका निराली कार्तिक (पुणे) यांचे गायन, शनिवार, १ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता विठ्ठल रखुमाई मित्रमंडळ, आचरा यांचा कार्यक्रम ''आनंदरंग पांडुरंग पांडुरंग'' हा कार्यक्रम होणार आहे.
बुधवार, ५ रोजी रात्री ११ वाजता हनुमान जयंतीनिमित्त रामेश्वर प्रॉडक्शन, मुंबई यांचे ''गाव तसो चांगलो'' हे दोन अंकी नाटक होणार आहे. गुरुवार, ६ रोजी रोजी हनुमान जयंती, श्री हनुमान जन्माचे कीर्तन मिलिंदबुवा कुळकर्णी करणार आहेत. या रामनवमी उत्सवात सहभागी होऊन भाविकांनी कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन संस्थानाचे अध्यक्ष मिलिंद प्रभूमिराशी व सचिव अशोक पाडावे यांनी केले आहे.