मठ गावचा शिमगोत्सव उत्साहात, आठशे वर्षांची ऐतिहासिक परंपरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 03:15 PM2019-03-28T15:15:23+5:302019-03-28T15:17:01+5:30
वेंगुर्ले तालुक्यातील मठ गावचा सुमारे आठशे वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेला शिमगोत्सव उत्साहात पार पडला. पारंपरिक घोडेमोडणीच्या कार्यक्रमाने शिमगोत्सवाची सांगता झाली. विविध रंगांच्या उधळणीमुळे अख्खे गाव रंगात न्हावून गेले होते.
सिंधुदुर्ग : वेंगुर्ले तालुक्यातील मठ गावचा सुमारे आठशे वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेला शिमगोत्सव उत्साहात पार पडला. पारंपरिक घोडेमोडणीच्या कार्यक्रमाने शिमगोत्सवाची सांगता झाली. विविध रंगांच्या उधळणीमुळे अख्खे गाव रंगात न्हावून गेले होते.
मठ येथील होळी उत्सवात पहिल्या दिवशी होळी पौर्णिमा, दुसऱ्या दिवशी हळद लावणे व त्यानंतर गव्हाची रात्र, घोडेमोडणी अशी प्रथा आहे. मुख्य मानकरी आपापली रोंबाटे घेऊन स्वयंभू देवस्थान येथील होळीच्या ठिकाणी येतात. दुपारनंतर प्रत्येक भागातून ही रोंबाटे येतात. यामध्ये तीन भागातून घोडेमोडणी केली जाते. ढोलताशांच्या गजरात घोडेमोडणी मानकरी व ग्रामस्थ घोडेमोडणी करतात. सायंकाळच्या वेळी बनाट्या फिरवण्याची प्रथा आजही जोपासली जात आहे.
विविध भागातील रोंबाटे व तीन मानकऱ्यांचे घोडे स्वयंभू मंदिराकडे आल्यानंतर तेथे त्या काळात घडलेल्या युद्धाची आठवण म्हणून लुटपुटीचे युध्द केले जाते. त्यानंतर रितीरिवाजाप्रमाणे धार्मिक कार्यक्रम पार पडल्यानंतर शिमगोत्सवाची सांगता होते. असा हा आठशे वर्षांची परंपरा लाभलेला मठ गावचा शिमगोत्सव यावर्षीही त्याच उत्साहात आणि जोशात साजरा करण्यात आला.
घोडेमोडणीला शेकडो वर्षांची परंपरा
सावंतवाडी संस्थान असताना वेंगुर्ले तालुक्यातील मठ हे गाव या संस्थानचा एक भाग होते. आजही संस्थानिक गाव म्हणून गावाची ओळख आहे. येथील स्वयंभू देवस्थान व मांगल्याचा मठ येथील शिलालेख आजही पहावयास मिळतात. स्वातंत्र्यपूर्व काळात संस्थानाकडून गावातील होळी उत्सवात हळदवणी येत असे. कालांतराने ही प्रथा बंद पडली. त्यावेळी मठ गावात जे युद्ध झाले, त्याची आठवण म्हणून घोडेमोडणीची प्रथा आजही सुरू आहे.