कोकणाने रचला इतिहास; सलग तिसऱ्या वर्षी राज्यात अव्वल
By admin | Published: June 18, 2014 12:42 AM2014-06-18T00:42:57+5:302014-06-18T00:57:45+5:30
दहावीचा ९५.५७ टक्के निकाल : कोकण बोर्डात सिंधुदुर्ग पहिला, तर रत्नागिरी दुसरा
रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोकण विभागीय मंडळातर्फे घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, एकूण निकाल ९५.५७ टक्के लागला आहे. राज्यात पुन्हा एकदा कोकणच अव्वल ठरला आहे. स्थापनेपासूनच्या सलग तिसऱ्या वर्षी दहावी आणि बारावी अशा दोन्ही निकालांमध्ये राज्यात प्रथम येण्याचा मान मिळवून कोकणाने इतिहास रचला आहे. यात दरवेळेप्रमाणे याहीवेळी मुलींनी बाजी मारली आहे.
राज्यातील एकूण नऊ मंडळांमध्ये कोकण मंडळाचा निकाल सर्वाधिक आहे. दुसऱ्या क्रमांकावरील कोल्हापूर मंडळाचा निकाल ९३.८३ टक्के, तर तिसऱ्या क्रमांकावरील पुणे मंडळाचा निकाल ९२.३५ टक्के लागला आहे.
कोकण मंडळाचे विभागीय अध्यक्ष बी. पी. कांबळे यांनी पत्रकार परिषदेमध्ये विभागाच्या निकालाविषयी माहिती दिली. यावेळी सचिव किरण लोहार, सहायक सचिव चंद्रकांत गावडे, उपशिक्षणाधिकारी डी. एस. पवार, सिंधुदुर्ग विस्तार अधिकारी पी. पी. मांजरेकर, लेखाधिकारी उत्तम शिंदे उपस्थित होते. रत्नागिरी-सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांतून ४१ हजार ५५२ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यांपैकी ३९ हजार ७१२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण विभागात २१ हजार ८३५ विद्यार्थी परीक्षेस बसले होते, त्यांपैकी २० हजार ७१८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९४.८८ टक्के इतके आहे. विभागात १९ हजार ७१७ मुली प्रविष्ट झाल्या होत्या. त्यापैकी १८ हजार ९९४ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९६.३३ टक्के आहे. संपूर्ण निकालात मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण अधिक असून, मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी १.४५ ने अधिक आहे. (प्रतिनिधी)