किल्ल्याच्या रूपात शिवरायांचा इतिहास
By admin | Published: November 13, 2015 09:33 PM2015-11-13T21:33:55+5:302015-11-13T23:39:13+5:30
संगमेश्वर तालुका : हरपुडे शाळा नं. १चा उपक्रम; अनेकांचे आकर्षण
देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील हरपुडे नं. १ शाळेत दिवाळीनिमित्त विद्यार्थ्यांनी बनवलेला किल्ला सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. विद्यार्थ्यांनी स्वत:च्या कल्पकतेने दगड, माती, पेपर, रंग यांचा उपयोग करून किल्ल्याच्या रूपात शिवरायांचा इतिहास उभा केला आहे. दिवाळी म्हटली की, इतिहाची ओळख करून देणारे किल्ले साकारण्यात लहान मुले रममाण होतात. शिवरायांच्या पराक्रमाचा इतिहास चिरंतर राहण्यासाठी गड, किल्ले साकारण्यासाठी आता विविध शाळादेखील भाग घेत आहेत. यामधून मुलांना इतिहासाची माहिती मिळावी, हा उद्देश आहे. सध्या केवळ पुस्तकातून गड, किल्ल्यांची माहिती विद्यार्थ्यांना मिळत आहे. त्याचा प्रत्यक्ष अनुभव त्यांना घेता येत नाही. हा अनुभव घेता येण्यासाठी हा उपक्रम राबविला.
मुख्याध्यापक नंदकुमार देसाई, शिक्षिका शोभा सनगर, पदवीधर शिक्षक सुनील करंबेळे, आत्माराम बने यांच्या मार्गदर्शनाखाली हा किल्ला बनवण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या कल्पनेतून साकारलेल्या किल्ल्यातून शिवरायांचा इतिहास उभा करण्याचा प्रयत्न केला आहे. किल्ला तयार करताना शुभम गोरूले, प्रितेश बेंद्रे, राकेश घुगे, रोशन भेरे, दीपराज बेंद्रे, तेजस किर्वे, सिध्देश गुरव यांनी मेहनत घेतली. केंद्रप्रमुख अशोक भालेकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजेंद्र सुर्वे, उपाध्यक्ष सुप्रिया गायकवाड, मीलन महाडिक यांनी सर्वांचे अभिनंदन केले. (वार्ताहर)