होड्या किनाऱ्यावर, २००० कुटुंबांची उपासमार
By admin | Published: April 7, 2016 11:40 PM2016-04-07T23:40:12+5:302016-04-07T23:55:54+5:30
पर्ससीन नेट मासेमारी बंद : लाभ मात्र गोव्यातील ट्रॉलर्सधारकांना; शासनाने जाळ्यांची पाहणी करावी
प्रथमेश गुरव - वेंगुर्ले गेल्या दोन महिन्यांपासून पर्ससीन नेट मासेमारी बंंद असल्याने वेंगुले येथील सुमारे १६0 छोट्या होड्या किनाऱ्यावर थांबल्या आहेत. त्यामुळे मत्स्य व्यवसायावर अवलंबून असलेल्या सुमारे २000 कुटुंबांवर या बंदीमुळे उपासमारीची वेळ आली आहे. या बंदीचा फायदा गोवा राज्यातील ट्रॉलर्सधारकांना होत असून, शासनाने येथील जाळ्यांची प्रत्यक्ष पहाणी करून येथील छोट्या होड्यांद्वारे मासेमारींना परवानगी द्यावी, अशी मागणी येथील मच्छिमार बांधव करीत आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्याला १२0 कि.मी.लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. या जिल्ह्यात प्रामुख्याने बांगडा, सुरमई, ढोमा, चिंगुळ, कर्ली, बळा, लेप, पेडवा, तारली, असे मासे मोठ्या प्रमाणावर आढळतात. सुरुवातीच्या काळात म्हणजे अगदी १९७0-८0 च्या दशकात वाहतुकीची साधने आणि मत्स्य प्रक्रिया कारखाने नसल्यामुळे मासेविक्री ही स्थानिक बाजारपेठांतून होत असे. सिंधुदुर्गामध्ये मासेमारी करणारी कुटुंबे प्रामुख्याने हुक फिशिंग, पाग, रापण आणि गिलनेट याप्रकारे मासेमारी करून आपला व्यवसाय चालवत होती. १९८0 पर्यंत वेंगुर्ले, शिरोडा, मालवण, निवती आणि देवगड परिसरात पारंपरिक रापण पद्धतीनेच मासेमारी चालायची. कालांतराने किनाऱ्यावर मासे मिळण्याचे प्रमाण खूपच कमी झाले. उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ न बसल्याने वेंगुर्ले तालुक्यातील रापण संघातील तरुणांनी आपल्या किनाऱ्यावर ओढावयाच्या रापणीमध्ये बदल केले. त्याला ट्रॉलरधारकांच्या तंत्राची जोड देऊन जाळ्याला गोल रिंग बांधल्या, या अशा सुधारित जाळ्यांमुळे थोड्या खोल पाण्यात म्हणजे ५ ते ८ वावपर्यंत समुद्रात या आधुनिक रापणीतून मासेमारी होऊ शकते, असे इथल्या मच्छिमारांचे म्हणणे आहे.
रापणीतून होणाऱ्या मासेमारीत ६0 टक्के तारली, २५ टक्के बांगडा आणि इतर मासे १0 टक्के मारले जातात. यातील तारली माशांची मासेमारी वेंगुर्ले तालुक्यात पारंपरिक मच्छिमाराकडून होेत नाही. या आधुनिक पद्धतीच्या जाळ्यातून होणाऱ्या मासेमारीला जलपृष्ठीय मासेमारी असे म्हणतात. म्हणजेच आधुनिक तंत्राचा वापर करून बनवलेली छोटे बोटधारक वापरत असलेली जाळी समुद्राचा तळ खरवडून काढत नाहीत. त्यामुळे समुद्री पर्यावरणाचीही हानी होत नाही. आधुनिक रापणीमुळे माशांच्या प्रजाती नष्ट होतात हा दावा पूर्णत: खोटा आहे. आधुनिक रापणीमध्ये केवळ सात ते आठ प्रकारच्या माशांची मासेमारी केली जाते.
समुद्रात जवळपास सुमारे साडेसहा हजार माशांच्या प्रजाती असून, त्यातील हजारो प्रजाती आज नष्ट झाल्या आहेत. आधुनिक रापणीत ८ ते १0 प्रकारचे मासे मारले जातात, तर बाकीच्या प्रजाती कशा नष्ट झाल्या याचाही शोध घेणे आवश्यक आहे, असे मच्छीमारांचे म्हणणे आहे.
आज पर्ससीन नेटधारक असे लेबल लावून सरसकट पर्ससीन मासेमारी बंदी घालताना या आधुनिक जाळ््यांची पाहणी करण्याचे सौजन्यही शासनाच्या मत्स्य विभागाने दाखविलेले नाही. त्यामुळे एकट्या वेंगुर्ले तालुक्यातील १६0 बोटी किनाऱ्यावर थांबल्या आहेत व २000 कुटुंबावर या सरसकट बंदीमुळे उपासमारीची वेळ आली आहे.
समृद्धी पर्यावरणाचे रक्षण करणाऱ्या आधुनिक रापण पद्धतीच्या या जाळ्यांची प्रत्यक्ष पहाणी करून शासनाने या छोट्या प्रकारच्या मासेमारीस मान्यता द्यावी, अशी मागणी येथील मच्छिमार बांधव करीत आहेत.
आधुनिक रापणच व्यवसायाला समृद्ध ठरेल
महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर पर्ससीन मासेमारीच्या बंदी घालण्याच्या
५ फेब्रुवारी २0१६ च्या निर्णयामुळे या व्यवसायावर अवलंबून असणारे ट्रान्सपोेर्ट, कोल्ड स्टोरेज, इंधनावर अवलंबून असणारे व्यवसाय, मत्स्य विक्री अशा सर्व व्यवसायांवर याचा परिणाम झाला आहे. वेंगुर्ले तालुका गोवा राज्याच्या सागरी सीमेला जोडलेला असल्याने या बंंदीचा फायदा गोवा राज्यातील मोठ्या ट्रॉलर्सधारकांना होणार आहे. अशा प्रकारची सरसकट बंदी पश्चिम किनाऱ्यावरच्या कुठल्याही सागरी राज्याने आजपर्यंत घातलेला नाही. एकूणच कोणताही व्यवसाय टिकण्यासाठी त्यामध्ये कालानुरूप बदल करणे आवश्यक असते. केवळ पारंपरिक रापणीवरच अवलंबून न राहता, उत्पन्न वाढीसाठी पर्यावरणाला बाधा न पोेचणाऱ्या आधुनिक तंत्राचा वापर करून बनविलेली आधुनिक रापणच मत्स्य व्यवसायाला समृद्धी देईल.