पन्नास लाखांच्या रकमेसह कार ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2016 12:47 AM2016-07-08T00:47:51+5:302016-07-08T00:54:48+5:30
आरोंदा येथे कारवाई : गोव्यातील दोघांची चौकशी
सावंतवाडी : कणकवलीहून आरोंदा मार्गे गोव्याकडे ५० लाखांची कॅश घेऊन जात असताना आरोंदा पोलिस दूरक्षेत्रावर गोव्यातील दोघा युवकांना कारसह ताब्यात घेतले आहे. त्यांची उशिरापर्यंत झाडाझडती सुरू होती. ताब्यात घेतलेल्या युवकांचे नाव विजयकुमार गोपीराव शर्मा व विक्रम रामचंद्र जंजीर असे असून, त्यांना रात्री उशिरापर्यंत त्यांच्याकडील या रकमेबाबतचे पुरावे सादर करता आले नव्हते.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, विजयकुमार शर्मा व विक्रम हे दोघे युवक दिवसभर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्यापाऱ्यांकडे आपली वसुली करून गोव्याकडे चालले होते. त्याच वेळी आरोंदा दूरक्षेत्रावर कार्यरत असलेले पोलिस हेडकाँस्टेबल झापू पवार नेहमीप्रमाणे गाड्यांची तपासणी करीत असतानाच तेथे एक कार आली.
पोलिसांनी इतर कारप्रमाणे या कारचीही चौकशी केली असता एका बॅगेत मोठ्या प्रमाणात पैसे असल्याचे पोलिसांना दिसून आले. पोलिसांनी ही बॅग ताब्यात घेत सोबत असलेल्या दोघा युवकांची चौकशी केली. यावेळी या युवकांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत; आम्ही व्यापारी असून, स्टीलच्या पैशाची वसुली करण्यासाठी आलो असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, या वसुलीबाबत त्यांच्याकडे कोणतीही पावती नसल्याने पोलिसांनी त्या युवकांना ताब्यात घेत सावंतवाडी पोलिस ठाण्यात आणले.
येथे पोलिस उपअधीक्षक प्रवीण चिंचळकर व पोलिस निरीक्षक शंकर पाटील या दोघांनी रात्री उशिरापर्यंत या दोघा युवकांची चौकशी केली; पण त्यावेळीही या युवकांनी समाधानकारक उत्तरे दिली नसल्याने अखेर पोलिसांनी या युवकांना रात्री उशिरापर्यंत व्यवसायातील पैसे असल्यास तुम्ही पावत्या जमा करा, अन्यथा तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असे सांगितले. त्यामुळे उशिरापर्यंत या युवकांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला नव्हता. अधिक तपास सा
वंतवाडी पोलिस करीत आहेत. (प्रतिनिधी)