सिंधुदुर्गात आता होलिकोत्सवाची धूम, चाकरमान्यांचे होणार आगमन; विविध कार्यक्रमांची रंगत
By सुधीर राणे | Published: February 27, 2023 04:24 PM2023-02-27T16:24:48+5:302023-02-27T16:25:19+5:30
पाच, सात, पंधरा दिवस या उत्सवाची धूम पहायला मिळते
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या उत्साहात होलिकोत्सव म्हणजेच शिमगोत्सव साजरा केला जातो. परंपरागत पध्दतीने जिल्ह्यात विविध ठिकाणी होळी उभारण्यात येते. तसेच तिची विधिवत पूजा करण्यात येते. ६ मार्च रोजी या होलिकोत्सवाला प्रारंभ होणार असून त्यानिमित्ताने कार्यक्रमांची धूम पहायला मिळणार आहे. त्याची तयारी ठिकठिकाणी सध्या सुरू असल्याचे दिसून येत आहे.
सिंधुदुर्गात होलिकोत्सव विविध ठिकाणी विविध प्रकारे साजरा केला जातो. पाच, सात, पंधरा दिवस या उत्सवाची धूम पहायला मिळते. त्यात खेळे, शबय, गोमूनृत्य, तमाशा आणि गावरहाटी प्रमाणे विविध धार्मिक कार्यक्रम होत असतात. या उत्सवाच्या निमित्ताने गावोगावी मुंबईकर मंडळी दाखल होत असतात. जिल्ह्यातील विविध ठिकाणी प्रथा, परंपरांप्रमाणे होलिकोत्सव साजरा केला जातो.
अनेक घरात होळीपौर्णिमेच्या दिवशी तांदळाच्या शेवया आणि नारळाच्या खोबऱ्याचा रस तसेच पुरणपोळ्या अशा लज्जतदार खाद्य पदार्थांचा बेत असतो. सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. वाडी वाडीत तसेच गाव होळीच्या ठिकाणी विविध कार्यक्रम होणार आहेत. काही ठिकाणी घरोघरी होळीचे मांड असतात. त्याठिकाणी तयारी सुरू झाली आहे. कार्यक्रम पाहण्यासाठी रात्रीच्या वेळी याठिकाणी गर्दी होत असते. तर अनेक ठिकाणी ग्रामदेवतांच्या मंदिरांच्या परिसरात असलेल्या होळीच्या माडांच्या ठिकाणी विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.
या होलिकोत्सव म्हणजेच शिमगोत्सवात रंगपंचमीलाही मोठे महत्व असते. त्याला धुळीवंदन असे म्हटले जाते. लहान थोर व्यक्ती यामध्ये सहभागी होत आनंद लुटत असतात. त्यामुळे या उत्सवाची विविध प्रकारे तयारी सुरू झाली आहे.