बेवारस बोटींची होळी करा
By admin | Published: March 24, 2016 11:25 PM2016-03-24T23:25:12+5:302016-03-24T23:38:56+5:30
मच्छिमार पुन्हा संतप्त : बोटींवर कारवाई नाही
मालवण : मालवण किनाऱ्यावर केरळ मासेमारीवरून सुरु असलेला वाद थांबण्याची कोणतीही चिन्हे दिसून येत नाही. किनाऱ्यावर बेवारस स्थितीत सापडून आलेल्या काही बोटींवर मत्स्य विभागाने पंचनामे करून नोटिसा चिकटवल्या व २२ मार्चपर्यंत बोट मालकांनी कागदपत्रे सादर करावीत. अन्यथा कारवाई करण्यात येईल. असे नमूद करण्यात आले होते. मात्र २२ तारीख उलटून गेली तरी या बोटींवर कोणतीही कारवाई न झाल्याने स्थानिक मच्छिमार पुन्हा संतप्त झाले. व मत्स्य अधिकाऱ्यांना घेराव घालून जाब विचारला.
यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी वरिष्ठ अधिकारी रत्नागिरी येथे असल्याचे सांगितले व परवाना अधिकारी वेंगुर्ले येथे गेल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे मच्छिमारांच्या संतापात भर पडली. या बोटींवर दिवसभरात कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी सहाय्यक मत्स्य आयुक्त विजय कांबळे यांच्याशी दूरध्वनीवरून बोटींवर कारवाईची मागणी करण्यात आली. अधिकारी वर्गाकडून सायंकाळपर्यंत कारवाई केली जाईल, असे स्पष्टीकरण देण्यात आले. गेले अनेक दिवस बेवारस स्थितीत काही नौका पडून आहेत. काही नौकांवर नोटीसा चिकटविल्या त्या मासेमारीस गेलेल्या आहेत. त्यामुळे मत्स्य विभागाच्या कार्यवाहीबाबत मच्छिमारांनी संताप व्यक्त केला. सहाय्यक आयुक्त यांच्याकडे रत्नागिरी येथील चार्ज आहे. सोमवार, मंगळवार, बुधवार ते रत्नागिरी येथे असतात. (प्रतिनिधी)
मागणी : मच्छिमारांना न्याय द्या
पुढील तीन दिवस ते सिंधुदुर्गात राहणे अपेक्षित आहे. मात्र, सलग सुट्या आल्यामुळे व सोमवारपासून पुन्हा ते रत्नागिरीस गेल्यास कारवाई होणार कशी? आज होळी उत्सव आहे. त्यामुळे या बेवारस बोटींची मत्स्य विभागाने होळी करावी व मच्छिमारांना न्याय मिळवून द्यावा, असे मच्छिमारांच्यावतीने सांगण्यात आले. यावेळी विकी तोरसकर, राजू आंबेरकर, महेश देसाई, बाबी जोगी यांच्यासह अन्य मच्छिमार उपस्थित होते.