प्रचाराची ‘घरघर’; विजयाची हुरहूर

By admin | Published: October 26, 2015 11:36 PM2015-10-26T23:36:28+5:302015-10-27T00:13:03+5:30

रत्नागिरी नगर परिषद : चुरशीच्या झुंजीत मतांचा जोगवा--रणसंग्राम

'Home' campaign; Wischi Huroor | प्रचाराची ‘घरघर’; विजयाची हुरहूर

प्रचाराची ‘घरघर’; विजयाची हुरहूर

Next

प्रकाश वराडकर -- रत्नागिरी नगरपरिषदेच्या पोटनिवडणुकीला आता अवघे चार दिवस उरले आहेत. सेना-राष्ट्रवादीतील या चुरशीच्या झुंजीत दोन्ही पक्षांचे नेते व कार्यकर्ते घरोघरी जाऊन मतांचा जोगवा मागत आहेत. प्रचाराची ही ‘घरघर’ सुरू असतानाच कोणत्याही पक्षाला कुठे काय होईल, कोण निवडून येईल, आपण किती पाण्यात आहोत, याचा थांगपत्ताही मतदारांनी लागू दिलेला नाही. त्यामुळे विजयाबाबत ‘हुरहूर’ निर्माण झाली आहे.
प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात चारही जागा राष्ट्रवादीलाच मिळतील, असे वातावरण निर्माण करण्यात उमेश शेट्ये यशस्वी झाले. मात्र, त्यानंतर शिवसेनाही पेटून उठली. प्रचाराचे रांगडे तंत्र अवलंबत प्रत्येक घरी आमदार, जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख यांनी भेट देऊन मतदारांना विश्वासात घेण्याचा, विकासकामांबाबत आश्वासने देण्याचा झपाटाच सुरू केला. त्यातच माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांनी उमेश शेट्येंविरोधात आरोपांच्या तोफा डागल्याने शेट्ये यांच्या प्रचारावर काहीसा परिणाम झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
मतदानाला अवघे चार दिवस उरलेले असताना काय होणार, याबाबतचे वातावरण संदिग्ध असून, कोणालाही या पोटनिवडणुकीत निर्भेळ यश मिळेल, असे वातावरण सध्यातरी नाही. उमेश शेट्ये यांचा उद्देश साध्य न झाल्यास त्यांच्या २०१६ व २०१९ च्या स्वप्नांवर पाणी फेरले जाणार काय? या प्रश्नांबरोबरच उमेश शेट्ये यांच्याबाबतच्या निकालाकडे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)


२०१६ ची तयारी?
उमेश शेट्ये यांना निवडणुकीत रोखले नाही तर २०१६मधील पालिकेच्या निवडणुकीत त्यांचे वारू रोखणे कठीण होणार असल्याची भीती सेनेलाही वाटत आहे. शेट्येंना रोखून राष्ट्रवादीची ताकद कमी करण्याची सेनेची खेळी असल्याची चर्चा आहे.


भाजप, मनसे चिडीचूप?
१ नोव्हेंबरला पोटनिवडणुकीचे मतदान होणार असतानाही या निवडणुकीत चारही उमेदवार उभे करणाऱ्या भाजपच्या हालचाली एकदम संथ आहेत. मनसेने दोन उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. मात्र, या दोन्ही पक्षांमध्ये शांतता आहे. भाजप नेते, उमेदवार गुपचूप प्रचार करीत असल्याचे सांगितले जात आहे. सन २०१६च्या सार्वत्रिक निवडणुकीची पार्श्वभूमी तयार करण्यासाठीच मनसेकडून ही निवडणूक दोन जागांवर लढविली जात असल्याचीही चर्चा आहे.

रिक्षातून विनापरवाना प्रचार?
अखेरच्या टप्प्यात काही उमेदवारांनी निवडणूक आचारसंहितेचे नियमांचे उल्लंघन केल्याची चर्चा पालिका वर्तुळात आहे. कोणतीही परवानगी न घेताच रिक्षांतून प्रचार केला जात असून, या रिक्षांना प्रचार फलकही चिकटविण्यात आल्याचे दिसून येत आहे. पालिकेकडून परवानगी न घेता प्रचार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. याबाबत पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून अशा संशयित रिक्षांची पाहणीही सुरू असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: 'Home' campaign; Wischi Huroor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.